Funeral procession of gas cylinder; Bread placed on stove : जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने १२ मार्चला जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. चिखली तहसीलमध्ये गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली, तर महिला कार्यकर्त्यांनी चूल मांडून तव्यावर भाकरी थापून इंधन दरवाढीचा निषेध नोंदविला.



कॉंग्रेसचे केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन
बुलढाणा : आखाती देशातील युद्धाचा फटका महाराष्ट्रालाही बसला आहे. जनता इंधनाच्या समस्यांनी त्रस्त झाली आहे. इंधन तुटवडा असतानाच गॅस सिलिंडरचे भाव केंद्र सरकारने वाढविल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याला केवळ केंद्र सरकारच कारणीभूत असल्याचा आरोप करीत जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने १२ मार्चला जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. चिखली तहसीलमध्ये गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली, तर महिला कार्यकर्त्यांनी चूल मांडून तव्यावर भाकरी थापून इंधन दरवाढीचा निषेध नोंदविला.
जिल्ह्यात तालुकास्तरावरदेखील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलने करून परिसर दणाणून सोडला. तहसील कार्यालयांसमोर कॉंग्रेसने गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा निषेध केला.
चिखली तहसीलदार निवेदन घेण्यासाठी कार्यालयाबाहेर न आल्याने पदाधिकारी आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना घेराव घातला. केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ केल्याने जनतेत रोष निर्माण झाला आहे. केंद्रात सत्तेत आल्यापासून सरकारने आजवर किमान ५० वेळा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. काँग्रेसच्या काळात ४०० रुपयांवर असलेला गॅस सिलिंडर आता ९०० रुपयांवर पोहोचला आहे. तसेच व्यावसायिक सिलिंडरही गेल्या आठवडाभरात १५० रुपयांनी महाग झाल्याने त्याची किंमतही १ हजार ९०० च्या जवळपास पोहोचली आहे. एकीकडे महिलांना लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे महिला दिनाच्या एक दिवस आधी दरवाढ लादून दरवाढीची भेट देण्याचा सरकारचा दुपट्टीपणा समोर आला आहे. गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरातील बजेट कोलमडले असून लाडक्या बहिणींवर चूल पेटवण्याची वेळ आली आहे, हेच का केंद्र सरकारचे अच्छे दिन? असा संतप्त सवाल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी चिखली येथील आंदोलनादरम्यान केला. अमेरिका ठरवेल ते आपल्या देशाचे धोरण झाले आहे. त्यामुळेच युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आली आहे. या युद्धाचा अंदाज आलेला असतानाही सरकारला नियोजन करता आले नाही, यावरून या सरकारची धोरणे कशी तकलादू आहेत, हेच स्पष्ट झाल्याचे बोंद्रे म्हणाले.
आंदोलनात रामभाऊ जाधव, अतहरोद्दीन काझी, अंबादास वाघमारे, शहराध्यक्ष जाकीर शेख, संगीता गाडेकर, विद्या देशमाने, खलील बागवान, अशोक पडघान, पांडुरंग भुतेकर, खलील बागवान, अशोक पडघान, पांडुरंग भुतेकर, आत्माराम देशमाने, वर्धमान डहाळे, श्याम पठाडे, समाधान आकाळ, सुनीता शिंगणे, शीतल देशमुख, सुप्रिया भटकर, स्वाती लहाने, सीमा देव्हडे, वहिदा बेगम, गोपाल देव्हडे, गोकुळ शिंगणे, आनंद बोंद्रे, संतोष देशमुख, आनंद बोंद्रे, प्रमिला जाधव, शालीनी वानखेडे, अनिता घुगे, प्रदीप पचेरवाल, सिद्धेश्वर परिहार, अंबादास खरात, विजय जागृत, प्रकाश सपकाळ, डॉ. रवींद्र कमळस्कर, भास्कर चांदोरे, दिगंबर देशमाने, शेख खैरू, अकील खान, दत्ता करवंदे, सुनील पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


