Historical heritage will be preserved :


लोणार सरोवर, जिजाऊ जन्मस्थळाला शेखावत देणार भेट
बुलढाणा : केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकाराने लवकरच जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांचा विकास होणार आहे. जिल्ह्यातील अनमोल ठेवा असलेले लोणार सरोवर, राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ आणि विविध ऐतिहासिक स्थळांच्या विकासाच्या दृष्टीने केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना जिल्ह्याचे महत्त्व सांगून बुलढाणा जिल्ह्यात येण्याचे निमंत्रण ना. जाधव यांनी दिले आहे.
खाऱ्या पाण्याचे जगप्रसिद्ध लोणार सरोवर आणि राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेड राजा येथे भेट देऊन पुरातत्व विभागाची बैठक बुलढाणा जिल्ह्यात घ्यावी, अशी विनंती केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना आज दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटीत केली. पर्यटनमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवित बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्याचे निमंत्रण स्वीकारले.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे उल्कापातामुळे निर्माण झालेले जागतिक दर्जाचे सरोवर आहे. या सरोवराला नुकताच रामसर सरोवराचा दर्जाही मिळाला आहे. लोणार सरोवरातील पाण्याची पातळी वाढत चालली आहे. त्यामुळे परिसरात असलेली पुरातन मंदिरे जलमय झाली आहेत. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेव जतन हा चिंतेचा विषय ठरला आहे. या विषयी तज्ज्ञांना पाचारण करून संशोधन होणे गरजेचे आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पर्यटनमंत्र्यांशी चर्चा करताना सांगितले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे आहे. राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा व इतरही ऐतिहासिक वास्तू येथे अस्तित्वात आहेत. उत्खननादरम्यान भगवान विष्णूची मूर्ती तेथे मिळाली. धार्मिक भावनांचा आदर करीत या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंदिर बनविणे गरजेचे आहे. शिवाय या परिसरामध्ये ऐतिहासिक वस्तूच्या निर्माण व ऐतिहासिक वारसा टिकून ठेवण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून यासाठी निधी द्यावा. जगप्रसिद्ध लोणार सरोवर आणि ऐतिहासिक राजमाता जिजाऊ जन्मस्थळ हे दोन्हीही स्थळ पर्यटन विभागाअंतर्गत येत असल्याने येथील विविध समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रत्यक्ष या स्थळांना भेटी देऊन येथेच विकासात्मक बाबीवर चर्चा करून बैठक घ्यावी, अशी विनंती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिल्ली येथे गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन केली.
बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन या दोन्ही स्थळांना भेटी देण्याचे निमंत्रण दिले. त्यांनी सकारात्मकता दर्शवित हे निमंत्रण स्वीकारले. पुरातत्व विभागाचे नियमांची शिथिल करण्याची मागणी
यावेळी श्रद्धाळूच्या कुंड जल स्नान विषयावरही चर्चा केली. पूर्वी या परिसरातील जलकुंडामध्ये श्रद्धाळूंना स्नान करण्याची आणि धारातीर्थ गोमुखातून कावड यात्रेसाठी पाणी घेऊन जाण्याची मुभा होती. परंतु कोविड काळामध्ये हे क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले होते. कोविडचा काळ संपुष्टात आल्यानंतर प्रतिबंधक नियम मागे घेण्यात आली नाही. हे नियम शिथिल करण्यासंदर्भात पुरातत्व विभागाला सूचना करण्याची विनंती ना. जाधव यांनी केली.


