Jijau Gyan Mandir receives the District-Level First Prize from the Sports Department. : जिजाऊ ज्ञान मंदिरास मिळाले क्रिडा विभागाचे जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक

बुलढाणा, १७ मार्च २०२६ : राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट, सुंदरखेड (बुलढाणा) यांच्या वतीने संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पळसखेड भट (रायपूर) या शाळेला महाराष्ट्र राज्य क्रिडा व युवक सेवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या वतीने २०२३-२४ या वर्षासाठी प्रोत्साहन अनुदान पुरस्कार व ट्रॉफी मिळाली आहे. शाळेला १९ वर्षे वयोगटातील उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
या पुरस्काराचे वितरण दि. १६ मार्च २०२६ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे मा. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. महानकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अधिकाधिक क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन गुणवत्ता साध्य करावी आणि जिल्हा, राज्य व देशाचे नाव उज्ज्वल करावे. शाळेच्या उत्कृष्ट सहभागाबद्दल व कामगिरीबद्दल दरवर्षी हे प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते. जिजाऊ ज्ञान मंदिरने जिल्ह्यात सर्वोच्च गुणांक मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे, याबद्दल अभिनंदन.

शाळेचे अध्यक्ष मा. संदीप दादा शेळके यांनी सांगितले की, कर्मचारी व क्रीडा शिक्षकांच्या अथक मेहनतीमुळे हे यश मिळाले. ग्रामीण भागातील शाळेला जिल्हास्तरीय क्रिडा पुरस्कार मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे. शाळेत दरवर्षी २०० हून अधिक विद्यार्थी क्रिडा स्पर्धेत भाग घेतात, त्यापैकी २५-३० विद्यार्थी राज्यस्तरावर पदक मिळवतात. हा पुरस्कार संपूर्ण शाळेच्या विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, कर्मचारी व पालकांचा सामूहिक यश आहे.
पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य किशोर सिरसाट, क्रीडा शिक्षक भूषण सिरसाट, सीईओ हेमंत देशमुख व कर्मचारी राहुल देशमाने उपस्थित होते. सोहळ्यात तालुका क्रिडा अधिकारी श्री. काटोलकर, श्री. धारपवार, श्री. केळे, श्री. मोहोळ आदींची उपस्थिती होती. संस्था अध्यक्ष संदीप शेळके यांच्या मार्गदर्शनाने शाळेच्या क्रिडा क्षेत्रातील यशाची ही दुसरी मोठी उपलब्धी आहे.


