Pornographic video using womans face goes viral : एका महिलेचा चेहरा मॉर्फ करून अश्लील फोटो आणि व्हिडीओ तयार करून ते व्हॉट्सॲपवर वायरल करणाऱ्या खळेगाव येथील एका २१ वर्षीय तरुणाला लोणार पोलिसांनी शिताफीने अटक केली.

घृणास्पद कृत्य करणाऱ्या आरोपीस अटक : लोणार पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल
लोणार : एका महिलेचा चेहरा मॉर्फ करून अश्लील फोटो आणि व्हिडीओ तयार करून ते व्हॉट्सॲपवर वायरल करणाऱ्या खळेगाव येथील एका २१ वर्षीय तरुणाला लोणार पोलिसांनी शिताफीने अटक केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
प्राप्त माहितीनुसार, लोणार तालुक्यातील एका गावामध्ये एका महिलेचा चेहरा वापरून बनविलेला अश्लील व्हिडीओ तसेच फोटो व्हायरल झाल्याने महिलेची बदनामी झाली. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर महिलेने लोणार पोलिसांत तक्रार दिली. आरोपीने हे व्हिडिओ पीडित महिलेसह गावातील इतर महिलांना व्हॉट्सॲपवर पाठवले होते. इतकेच नाही तर, आपली ओळख लपवून आरोपीने महिलांना नग्न व्हिडीओ कॉलदेखील केले होते. या गंभीर प्रकारामुळे परिसरात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण होते.
महिलेच्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी तांत्रिक तपास चक्रे फिरवली. तपासाअंती रवी गजानन वायाळ (वय २१, रा. खळेगाव, ता. लोणार) याला ८ मे २०२६ रोजी अटक करण्यात आली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला २० हजार ५०० रुपये किमतीचा ‘One Plus’ कंपनीचा मोबाइल जप्त करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर, पोलिस शिपाई गणेश लोढे, अनिल शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तर सायबर सेलचे राजू आडवे आणि पवन मखमले यांनी तांत्रिक दृष्ट्या पोलिस तपासात मदत केली.


