Corrupt Surveyor and Headquarters Assistant Arrested : लाचखोर भूमापकासह मुख्यालय सहायकास पकडलेजळगाव जामोद भूमिअभिलेख कार्यालयात ट्रॅप यशस्वी

बुलढाणा
अर्जात त्रुटी असल्याचे सांगून दहा हजारांची लाच घेणाऱ्या जळगाव जामोद भूमिअभिलेख कार्यालयातील भूमापक व मुख्यालय सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२ मे रोजी रंगेहाथ पकडले.
भूमापक विश्वजीत विनायक सोनोने (वय ५३) व मुख्यालय सहायक सचिन वाजपे (वय ४८) अशी लाचखोर कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दोघेही जळगाव जामोद येथील भूमिअभिलेख कार्यालयात कार्यरत आहेत. तक्रारकर्त्याने त्यांच्या वडिलांच्या नावाने असलेल्या प्लॉटच्या मोजणीकरिता शासकीय शुल्क भरून ऑनलाइन अर्ज भूमिअभिलेख कार्यालयात १९ जानेवारी २०२६ रोजी दाखल केला होता. १६ मार्च रोजी परिरक्षण भूमापक विश्वजीत सोनोने याने तक्रारदारास कार्यालयात भेटण्यास बोलावले. अर्जामध्ये मोबाइल क्रमांक चुकीचे टाकलेले असून प्लॉटमधील दिशा चुकीच्या आहेत. तुमचा अर्ज त्रुटीमध्ये आहे. हा अर्ज रद्द न करण्यासाठी तसेच त्रुटीची पूर्तता करून मोजणी लवकरात लवकर करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत १७ मार्च २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली.
त्यानुसार १७ मार्च रोजी पडताळणी कार्यवाही करण्यात आली. सोनोने याने तक्रारदारांना तुमच्या कामासंदर्भात तुम्ही कार्यालयातील मुख्यालय सहायक वाजपे यांना भेटून घ्या, असे सांगितले. त्यानुसार वाजपे यांची भेट घेतली असता वाजपे यांनी कामासाठी दहा हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. १२ मे २०२६ रोजी सोनोने यांची लाच मागणीबाबत पडताळणी केली असता त्यांनी तक्रारदारास दहा हजार रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्यास संमती दिली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून लाच घेताना आरोपींना पकडले.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खाली लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/
या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश पवार, विलास गुसिंगे, दीपक जाधव, अमोल झिने, शैलेश सोनवणे, रणजित व्यवहारे, पंढरी शेळके, अर्शद शेख, नितीन शेटे यांनी या पथकात सहभाग घेतला.


