mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

चिखलीच्या रस्त्यावरील भ्रष्टाचाराचा भंडाफोड : Corruption on Chikhali Roads Exposed

शेअर करा :

Corruption on Chikhali Roads Exposed : चिखलीच्या रस्त्यावरील भ्रष्टाचाराचा भंडाफोड: शिवसेना विद्यार्थी सेनेचे ‘व्हाईट टॉपिंग’ विरोधात रणशिंग

Corruption on Chikhali Roads Exposed


बुलढाणा :  चिखली ते जाफ्राबाद दरम्यानच्या २.५० कोटी रुपयांच्या ‘व्हाईट टॉपिंग’ रस्त्याच्या कामातील कथित भ्रष्टाचार आणि प्रशासकीय दिरंगाईविरोधात शिवसेना विद्यार्थी सेनेने एल्गार पुकारला आहे. चिखली तालुकाप्रमुख ओमराजे मदनराजे गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली, येत्या १ जून २०२६ रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘तीव्र शांततापूर्ण लक्षवेधी आंदोलन’ करण्यात येणार आहे. या आंदोलनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि संबंधित कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

 

कोट्यवधींचा भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामाचा दर्जा

चिखली ते जाफ्राबाद (डॉ. काळुंसे हॉस्पिटल ते आमराई) या महत्त्वाच्या रस्त्यासाठी २.५० कोटी रुपये खर्चून सिमेंट काँक्रीटीकरण (व्हाईट टॉपिंग) मंजूर करण्यात आले होते. मात्र, कंत्राटदाराने तांत्रिक नियमांची सर्रास पायमल्ली करत अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप ओमराजे गायकवाड यांनी केला आहे. कामाचा दर्जा इतका सुमार असतानाही, PWD ने घाईघाईने कंत्राटदाराला अडीच कोटींचे बिल कसे अदा केले, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या प्रकारामुळे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय बळावला आहे.

 

धुळीचे साम्राज्य, अपघातांची मालिका आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात

रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने संपूर्ण मार्गावर धुळीचे भयानक लोट उसळत आहेत. यामुळे दुचाकी वाहनचालकांना समोरचे वाहनही स्पष्ट दिसत नाही, परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या धुळीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार आणि डोळ्यांच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. नियमानुसार रस्त्यावर नियमित पाणी मारणे आवश्यक असतानाही, कंत्राटदाराकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. पावसाळा तोंडावर असल्याने, जर हे काम वेळेत पूर्ण झाले नाही, तर चिखलीकरांना चिखल आणि वाहतूक कोंडीच्या भीषण समस्येला सामोरे जावे लागेल, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

 

RTI कायद्याची थट्टा आणि अर्जदाराचा मानसिक छळ

या रस्त्याच्या कामाचे तांत्रिक पुरावे बाहेर येऊ नयेत यासाठी माहितीचा अधिकार (RTI) कायदा २००५ अंतर्गत मागवलेली माहिती जाणीवपूर्वक दडपली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांनी कधी मुंबई तर कधी अमरावतीचे प्रशासकीय कारण सांगून २४/०४/२०२६, ०६/०५/२०२६ आणि १९/०५/२०२६ अशा वारंवार सुनावण्या पुढे ढकलल्या आहेत. अर्जदार ओमराजे गायकवाड यांना चिखलीवरून बुलढाण्याला विनाकारण हेलपाटे मारायला लावून त्यांचा वेळ आणि पैसा वाया घालवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हा प्रकार म्हणजे RTI कायद्याची थट्टा असून, अर्जदाराचा मानसिक छळ असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.

 

शिवसेना विद्यार्थी सेनेच्या प्रमुख मागण्या:

या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी शिवसेना विद्यार्थी सेनेने प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत:

 

१. तात्काळ काम पूर्ण करा: चिखली-जाफ्राबाद रस्त्याचे रखडलेले काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी, उच्च तांत्रिक निकष पाळून आणि दर्जा सुधारून युद्धपातळीवर तात्काळ पूर्ण करण्यात यावे.

२. दोषींवर कारवाई: दोषी शाखा अभियंता व उपअभियंत्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

३. कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करा: कंत्राटदाराला दिलेली २.५० कोटींची रक्कम वसूल करून त्याला तातडीने ‘ब्लॅकलिस्ट’ (काळ्या यादीत) टाकण्यात यावे.

४. सखोल चौकशी: या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) आणि लोकायुक्त यांच्यामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.

 

आंदोलनाची रूपरेषा आणि प्रशासनाला कडक इशारा

हे आंदोलन सोमवार, दिनांक ०१ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत मा. जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा समोर शांततापूर्ण मार्गाने करण्यात येणार आहे. ओमराजे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे की, लोकशाही आणि सनदशीर मार्गाने जनतेचा संताप थेट जिल्हाधिकारी यांच्या दालनापर्यंत पोहोचवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या शांततापूर्ण आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील, असा कडक इशारा ओमराजे गायकवाड आणि चिखलीतील सर्व सुजाण नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.

 

चिखलीच्या रस्त्यावरील या भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसेना विद्यार्थी सेनेने पुकारलेले हे आंदोलन, प्रशासकीय अनास्था आणि भ्रष्टाचाराविरोधात एक महत्त्वाचा आवाज ठरणार आहे. या आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top