mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

सिंदखेडराजा येथील रेशन दुकानात काळाबाजार : Black marketing at the ration shop in Sindkhed Raja.

शेअर करा :

Black marketing at the ration shop in Sindkhed Raja. : सिंदखेडराजा येथील रेशन दुकानात काळाबाजार? नागरिकांचा संताप, तहसील कार्यालयावर धडक!

Black marketing at the ration shop in Sindkhed Raja.


बुलढाणा : जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १५००२५००२८४ चे दुकानदार संजय सिताराम मेहेत्रे यांच्या विरोधात रेशनधारकांनी गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आणि चालू मे महिन्याचे रेशनचे धान्य दिले जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयात लेखी तक्रार सादर केली आहे.

 

‘माल संपला’च्या नावाखाली नागरिकांची फरफट

तक्रारदार रामेश्वर आत्रासाहेब वानखेडे आणि विजय सुदाम भालमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानदार नागरिकांना वारंवार ‘माल संपला’, ‘दोन दिवसांनी या’, ‘अजून बाकी आहे’, ‘तुम्हाला आला की फोन करतो’ अशी कारणे देत टाळाटाळ करत आहेत. विशेष म्हणजे, दुकानदार स्वतःहून कधीही फोन करत नाहीत आणि नागरिकांनी फोन केल्यास तो उचलत नाहीत. ‘शासनाकडून मालच आला नाही’ असे सांगून नागरिकांना हेलपाटे मारायला लावले जात आहेत. अनेक वेळा सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकानासमोर थांबूनही दुकानदार हजर राहत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

 

पारदर्शकतेचा अभाव आणि राजकीय दबावाचा आरोप

तक्रारीनुसार, दुकानावर किती माल आला आणि किती वाटप झाला याची कोणतीही माहिती बोर्डावर लावण्यात येत नाही. त्यामुळे धान्य नेमके कुठे जाते? असा संतप्त सवाल आता रेशनधारक विचारू लागले आहेत. काही नागरिकांनी दुकानदारावर राजकीय दबाव टाकत असल्याचाही गंभीर आरोप केला आहे. “फोन केला तर शेतात आहे, दवाखान्यात आहे अशी कारणे सांगितली जातात, पण प्रत्यक्षात धान्य वाटप होत नाही. गरिबांच्या तोंडचा घास हिरावला जात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया तक्रारदारांनी व्यक्त केली.

 

प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

या गंभीर आरोपांमुळे सिंदखेडराजा शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रारदारांनी प्रशासनाला तातडीने कठोर कारवाई करून थकीत धान्य वाटप करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, तहसील कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन, अर्जाची प्रत महसूल मंत्री, जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांना रामेश्वर आण्णासाहेब वानखेडे आणि पत्रकार विजय सुदाम भालमोडे यांनी दिली आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि सिंदखेडराजाच्या गरीब नागरिकांना न्याय मिळवून देते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top