mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

एका चिमुकल्याच्या साक्षीने उलगडले क्रौर्याचे गूढ पतीला जन्मठेप : A child’s testimony unravels the mystery of cruelty, leading to life imprisonment for the husband

शेअर करा :

A child’s testimony unravels the mystery of cruelty, leading to life imprisonment for the husband : एका चिमुकल्याच्या साक्षीने उलगडले क्रौर्याचे गूढ: पतीला जन्मठेप

A child's testimony unravels the mystery of cruelty, leading to life imprisonment for the husband


बुलढाणा : देऊळगाव राजा येथील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले होते. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या शिवकन्या गिते हत्याकांडाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी पती सुनील भास्कर गिते याला जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दुवा ठरला तो शिवकन्याचा आठ वर्षांचा चिमुकला मुलगा प्रतीक, ज्याच्या साक्षीने क्रौर्याचे हे गूढ उलगडले.

 

क्रौर्याची कहाणी आणि न्यायाचा प्रवास

शिवकन्या सुनील गिते (वय २५) हिचा पती सुनीलने ३ एप्रिल २०२३ रोजी साडीने गळा आवळून घरातच खून केला होता. ही घटना घडण्यापूर्वी शिवकन्या पती, सासू आणि सासऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आपल्या आठ वर्षांच्या मुलासह माहेरी राहत होती. तिने यापूर्वी पोलिसांत त्रासाबाबत तक्रारीही केल्या होत्या, परंतु घटनेच्या १५ दिवस आधी मध्यस्थांमार्फत त्यांच्यात तडजोड झाली आणि शिवकन्या मुलासह सासरी परतली. मात्र, अवघ्या चार-पाच दिवसांतच, ३ एप्रिल रोजी पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले आणि याच भांडणादरम्यान सुनीलने शिवकन्याचा साडीने गळा आवळून खून केला.

 

घटनेनंतर शेजारी राहणाऱ्या कल्पना बोधने यांनी शिवकन्याला बेशुद्ध अवस्थेत पाहून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राहुल कायंदे यांच्या गाडीने तिला देऊळगाव राजा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

 

सुरुवातीला देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु, चौकशी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे यांनी केलेल्या तपासणीत, साक्षीदारांचे जबाब आणि शवविच्छेदन अहवालावरून शिवकन्याचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले. तिच्या गळ्यावर जखमांच्या खुणा होत्या. यानंतर, ६ एप्रिल २०२३ रोजी आरोपी सुनील गितेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान सासरच्या त्रासाचे पुरावे समोर आल्याने गुन्ह्यात कलम ४९८-अ, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ ची वाढ करण्यात आली.

 

चिमुकल्याची साक्ष ठरली निर्णायक

हा खटला बुलढाणा सत्र न्यायालयात चालवण्यात आला. सरकारी पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले, ज्यात सर्वात महत्त्वाची आणि निर्णायक साक्ष मयत शिवकन्याचा आठ वर्षांचा मुलगा प्रतीक सुनील गिते याची ठरली. प्रतीक हा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी होता आणि त्याच्या निष्पाप पण सत्यकथनाने न्यायालयाला घटनेचे खरे स्वरूप समजण्यास मदत झाली. शेजारी कल्पना बोधने, राहुल कायंदे, मृतकचे वडील अशोक सोनुने, भाऊ पवन सोनुने, मध्यस्थ उद्धव घुगे, पंच साक्षीदार योगिता सोनुने, पंढरीनाथ नागरे, अजितसिंग बावरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नेहा अवचार, डॉ. शाहीन आसमा आणि तपास अधिकारी हेमंत शिंदे, जीवन सोनोवणे व किरण खाडे यांच्या साक्षी एकमेकांशी सुसंगत ठरल्या आणि त्यांनी सरकारी पक्षाच्या बाजूला बळकटी दिली.

 

बचाव पक्षाने शिवकन्याने आत्महत्या केल्याचा दावा केला, परंतु सरकारी वकील सोनाली सावजी देशपांडे यांनी अत्यंत भक्कमपणे बाजू मांडत, हा गळा आवळून केलेला खून असल्याचे विविध उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करून सिद्ध केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी आरोपी सुनील गिते याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दंडाच्या एकूण रकमेपैकी आठ हजार रुपयांची रक्कम बालसाक्षीदार प्रतीक याला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

 

या खटल्यात सासरे भास्कर गिते यांचा मृत्यू झाला, तर सासू चंद्रभागाबाई गिते यांची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाला कोर्ट पैरवी म्हणून देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे पोहेकॉ सुनील साळवे यांनी मोलाचे सहकार्य केले, तर बचाव पक्षातर्फे ॲड. पी. आर. सानप यांनी काम पाहिले.

 

या निकालाने केवळ शिवकन्याला न्याय मिळाला नाही, तर एका चिमुकल्याच्या साक्षीने सत्य कसे बाहेर येते, हे देखील सिद्ध झाले. हा निकाल समाजात एक महत्त्वाचा संदेश देतो की, क्रूरता कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी, न्याय आणि सत्य नेहमीच विजयी होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top