Counterfeit Currency Racket Busted in Malegaon : मालेगावमध्ये बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त: पेट्रोल पंपचालकाच्या सतर्कतेमुळे सात आरोपी गजाआड

मालेगाव २९ : मालेगाव शहरात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पेट्रोल पंपचालक विकास गवळी यांच्या अतुलनीय सतर्कतेमुळे ही टोळी पोलिसांच्या हाती लागली असून, या प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. मालेगाव पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बनावट नोटांच्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.
नेमके काय घडले?
२९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास मालेगाव ते वाशीम मार्गावरील अमानीनजीक असलेल्या विकास गवळी यांच्या पेट्रोल पंपावर एपी-०७-एसी-४५५४ या क्रमांकाची इनोव्हा कार आली. या कारमधील सात व्यक्तींनी आपल्या गाडीत दोन हजार रुपयांचे डिझेल भरले. डिझेलचे पैसे देताना त्यांनी पाचशे रुपयांच्या दोन बनावट नोटांसह एक हजार रुपयांची खरी नोट दिली. या बनावट नोटांवर “भारतीय बच्चो का बँक चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया” असे लिहिलेले होते, जे पेट्रोल पंपावरील कर्मचारी माधव केशव काटेकर (वय ६१) यांच्या निदर्शनास आले.
माधव काटेकर यांच्या सतर्कतेमुळे तात्काळ त्यांनी या नोटा खोट्या असल्याचे ओळखले आणि गाडी थांबवण्यास सांगितले. त्यांनी तत्काळ पंपाचे मालक विकास गवळी यांना या घटनेची माहिती दिली. विकास गवळी यांनी प्रसंगावधान राखून गाडी थांबवून ठेवली आणि तात्काळ पोलिसांना कळवले.
पोलिसांची तत्पर कारवा
मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश खेरडे आणि त्यांच्या टीमने घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंप मालक आणि कर्मचाऱ्यांच्या समक्ष इनोव्हा कारची तपासणी केली असता, त्यांना धक्कादायक बाब आढळून आली. कारमध्ये “भारतीय बच्चो का बँक चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया” असे लिहिलेल्या ५०० रुपयांच्या तब्बल ४७०० बनावट नोटा सापडल्या, ज्यांची एकूण किंमत २३ लाख ५० हजार रुपये होती.
पोलिसांनी तात्काळ कारमधील सातही आरोपींना कारसह ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला आणले. कर्मचारी माधव केशव काटेकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पीएसआय राजेश यलगुलवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
अटकेतील आरोपी आणि तपास पथक
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सात आरोपींमध्ये रमेश व्यंकटेश्वर पालापु (वय ४८), सय्यद खालीद सय्यद ख्वाजा (वय ३८), विराबाबु व्यंकटेश्वर राव (वय ३८), सय्यद कदीर सय्यद ख्वाजा (वय ४६), शेख अमीर खुसरो अफसर अली (वय ४०), शेख हमीद शेख हबीब (वय ३६) आणि मो. मोसीन खान मो. मुख्तार खान (सर्व रा. शहापूर गाजुरा रामाराम, मलकाजगीरी, हैदराबाद) यांचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल, पोनि राजेश खेरडे, पोउपनि राजेश यलगुलवार, पोलीस हवालदार मनीष राठोड, शिवाजी काळे, जयशंकर पाटील, नाईक पोलीस कॉन्स्टेबल विजेंद्र इंगोले, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार, वैभव झरकर आणि गणेश मेटांगळे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
या घटनेमुळे मालेगाव परिसरात बनावट नोटांच्या रॅकेटचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. मात्र, पेट्रोल पंपचालक विकास गवळी यांच्या सतर्कतेमुळे आणि मालेगाव पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे एक मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात यश आले आहे. या घटनेमुळे नागरिकांनी व्यवहारात अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


