A golden moment of pride for Savali village. : सावळी गावासाठी अभिमानाचा सुवर्णक्षण; दोन युवकांची इंडियन आर्मीमध्ये निवड

बुलढाणा, दि. 10 : बुलढाणा जिल्ह्यातील सावळी गावासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला असून गावचे सुपुत्र सज्जन श्रीकृष्ण वाघ आणि आकाश देवकुबा वाघ यांची इंडियन आर्मीमध्ये निवड झाली आहे. मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज झालेल्या या दोन्ही युवकांनी आपल्या कुटुंबासह संपूर्ण सावळी गावाचे नाव उंचावले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सावळी येथे विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मा. विशाल नरवाडे (IAS), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली तसेच सावळीचे आदर्श सरपंच डॉ. तेजराव नरवाडे यांच्या हस्ते दोन्ही युवकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या दोन्ही जवानांचे अभिनंदन करत त्यांच्या यशाचे कौतुक केले. अनेक वर्षांनंतर सावळीच्या मातीतून देशसेवेसाठी दोन युवक सैन्यदलात दाखल होत असल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सज्जन वाघ आणि आकाश वाघ यांच्या या यशामुळे गावातील युवकांना देशसेवा, शिस्त, परिश्रम आणि समर्पणाची प्रेरणा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यांच्या या यशामागे कुटुंबीयांचे प्रोत्साहन, कठोर परिश्रम आणि जिद्द महत्त्वाची ठरल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
सावळी गावासाठी हा क्षण केवळ अभिमानाचा नसून भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. देशसेवेच्या पवित्र कार्यासाठी सज्ज झालेल्या या दोन्ही वीरपुत्रांना उज्ज्वल भविष्यासाठी आणि यशस्वी सैन्य कारकिर्दीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
“सज्जन श्रीकृष्ण वाघ आणि आकाश देवकुबा वाघ यांच्या इंडियन आर्मीतील निवडीमुळे सावळी गावाचा गौरव वाढला असून, त्यांच्या यशाने संपूर्ण गावाचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.”


