mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मेहकरमध्ये राजकीय महाभूकंप : Political earthquake in Mehkar

शेअर करा :

Political earthquake in Mehkar : मेहकरमध्ये राजकीय महाभूकंप: काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरेंना पाठिंबा, शिंदे गटाला जबर धक्का

Political earthquake in Mehkar


 बुलढाणा :  जिल्ह्यातील मेहकरच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेसच्या 11 पैकी तब्बल 9 नगरसेवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत जाहीर पाठिंबा दिला आहे. या अनपेक्षित घडामोडीमुळे मेहकर नगरपालिकेत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असून, एकेकाळी विरोधकांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या शहरातून शिंदे गटाचा प्रभाव पूर्णपणे संपुष्टात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सिद्धार्थ खरात यांच्या विजयापासून सुरू झालेले वादळ

मेहकर विधानसभा मतदारसंघात आमदार सिद्धार्थ खरात यांच्या ऐतिहासिक विजयापासून सुरू झालेले राजकीय वादळ आता अधिकच तीव्र झाले आहे. तब्बल चार दशकांपासून रुजलेली राजकीय मक्तेदारी मोडीत काढत ठाकरे शिवसेनेने विधानसभा जिंकली आणि त्यानंतर नगरपरिषदेतही सत्ता हस्तगत केली. आता काँग्रेसच्या 9 नगरसेवकांनी दिलेल्या अधिकृत पाठिंब्यामुळे या राजकीय परिवर्तनावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Political earthquake in Mehkar


महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसचे मिळून आता 16 सदस्यांचे स्पष्ट बहुमत झाले आहे. यामुळे नगरपालिकेतील सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. विरोधात असलेल्या शिंदे गटासाठी हा धक्का केवळ संख्याबळाचा नसून, त्यांच्या भविष्यातील राजकीय अस्तित्वालाच मोठे आव्हान मानला जात आहे.

Political earthquake in Mehkar


सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी 9 नगरसेवकांच्या स्वाक्षरीयुक्त समर्थनपत्रासह नगराध्यक्ष किशोर गारोळे यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला. या घोषणेनंतर मेहकरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

विरोधकांच्या होम ग्राउंडवर महाविकास आघाडीचा बुलडोझर

राजकीय जाणकारांच्या मते, विधानसभा निवडणुकीतील विजय, नगराध्यक्षपदावरील कब्जा आणि आता काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा या सलग घटनांमुळे मेहकरमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व निर्विवाद निर्माण झाले आहे. अनेक वर्षे सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या शिंदे गटाचे राजकीय कंबरडे मोडल्याची चर्चा असून, आगामी काळात आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “विरोधकांच्या होम ग्राउंडवर महाविकास आघाडीचा बुलडोझर मेहकरचा गड जिंकून आता सत्ता अभेद्य झाली आहे. खरात-गारोळे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांचा शेवटचा किल्लाही ढासळला,” अशा प्रतिक्रिया आता राजकीय वर्तुळात उमटत आहेत.

पाठिंबा देणारे काँग्रेस नगरसेवक:

• मोहम्मद अलीम मोहम्मद ताहेर (गटनेते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तथा नगरसेवक)
• सौ. मंगला सुरेश मानवतकर (नगरसेविका)
• मुजीब हसन अब्दुल हबीब कुरेशी (नगरसेवक)
• मुजीब खानवली महम्मद खान पठाण (नगरसेवक)
• अंजुम बानो शेख अख्तर कुरेशी (नगरसेविका)
• शबनूर बी शेख रईस कुरेशी (नगरसेविका)
• सौ. सुनीता संजय ढाकरके (नगरसेविका)
• वैभव गिरीष उमाळकर (नगरसेवक)
• श्रीमती नीलिमा शरद सोमण (नगरसेविका)

या सर्व नगरसेवकांनी काँग्रेसचे गटनेते अलीम ताहेर यांच्यासह स्वाक्षऱ्या करून नगराध्यक्ष किशोर गारोळे यांना पाठिंबा जाहीर केला.

शिवसेना गटनेते विलास चनखोरे यांच्या निवासस्थानी झालेल्या या पत्रकार परिषदेवेळी आमदार सिद्धार्थ खरात, काँग्रेस नेते शाम उमाळकर, नगराध्यक्ष किशोर गारोळे, शिवसेना गटनेते विलास चनखोरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, युवा सेना तालुका प्रमुख ॲड. आकाश घोडे, काँग्रेस नेते ॲड. अनंतराव वानखेडे, शहराध्यक्ष पंकज हजारी, काँग्रेस पदाधिकारी कलीम खान, माजी नगरसेवक शैलेश बावस्कर, गजेंद्र माने, शिवसेनेचे नगरसेवक प्रा. सतीश ताजने, महेश रिंढे, नितीन तुपे, अमर घोडे, निसार अन्सारी, काँग्रेसचे निलेश सोमण, निलेश मानवतकर, वसीम कुरेशी, शिवसेनेचे संदीप गारोळे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेहकरमधील हा राजकीय भूकंप केवळ शहरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण बुलढाणा जिल्हा आणि राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधकांच्या बालेकिल्ल्यात झालेल्या या मोठ्या घडामोडीमुळे महाराष्ट्रभर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top