mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

विराज प्रोफाईल्स कंपनीतील छळाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या : Engineer commits suicide, driven to despair by harassment at Viraj Profiles company

शेअर करा :

Engineer commits suicide, driven to despair by harassment at Viraj Profiles company : विराज प्रोफाईल्स कंपनीतील छळाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या

Engineer commits suicide, driven to despair by harassment at Viraj Profiles company
जीवन संपविण्यापूर्वी लिहिली सुसाइड नोट

 बुलढाण्याचे मूळ रहिवासी : पालघर जिल्ह्यातील कंपनीत होते नोकरीला : आरोपींवर कठोर कारवाईची नातेवाईकांची मागणी

बुलढाणा : येथील मूळ रहिवासी असलेले व बोईसर येथील नामांकित विराज प्रोफाईल्स स्टेनलेस स्टील कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेले प्रदीप सुखदेव जाधव यांनी कंपनीतील कथित मानसिक छळ आणि त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कंपनीचे सीईओ जितेंद्र गर्ग यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी जाधव यांनी लिहून ठेवली आहे. या प्रकरणामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून जाधव कुटुंबीयांनी कंपनीच्या मालकासह नऊ जणांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रदीप जाधव हे गेल्या सात वर्षांपासून बोईसर येथील विराज प्रोफाईल्स कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर पदावर कार्यरत होते. मात्र कंपनीचे मालक नीरज कोच्चर, सीईओ जितेंद्र प्रताप गर्ग यांच्यासह काही वरिष्ठांकडून त्यांना सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. जातिवाचक शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. १९ जून रोजी प्रदीप जाधव यांना कंपनी मालकाच्या बंगल्यावर बोलावण्यात आले होते.त्या ठिकाणी सीईओसह एकूण नऊ जण उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रदीप जाधव यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.या बैठकीनंतर प्रदीप जाधव थेट आपल्या फ्लॅटवर गेले आणि त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली. त्या नोटमध्ये कंपनीतील अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित त्रासाचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर त्यांनी गळफास घेऊन जीवन संपविले. या घटनेनंतर बोईसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुसाईड नोट जप्त केली आहे. पत्नी वंदना प्रदीप जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीएनएसच्या कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, प्रदीप जाधव यांच्या पत्नी वंदना जाधव आणि मुलगा यश जाधव यांनी आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच राज्यात सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनात या प्रकरणाची चर्चा करून जाधव कुटुंबाला न्याय द्यावा, तसेच खासगी कंपन्यांमध्ये अधिकारी व कामगारांवर होणाऱ्या कथित मानसिक छळाविरोधात सरकारने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top