mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

लोणार सरोवर बुडण्यापासून वाचवा हो! : Save Lonar Lake

शेअर करा :

Save Lonar Lake : उल्कापाताने निर्माण झालेले लोणार सरोवर वाढत्या पाणीपातळीमुळे संकटात सापडले आहे.  त्यावर उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी २८ जानेवारीला कमळजा माता सेवा संघ, सर्व पक्ष व नागरिकांनी लोणार बंद पुकारला.

Save Lonar Lake

लोणारमध्ये कडकडीत बंद ; लोणारवासीयांची आर्त मागणी : वाढती जलपातळी चिंतेचा विषय


मयूर गोलेच्छा

लोणार : उल्कापाताने निर्माण झालेल्या लोणार येथील जागतिक कीर्तीच्या लोणार सरोवरात नैसर्गिकरीत्या होणारे बदल सरोवराच्या अस्तित्वाला धोका ठरू लागले आहेत. सरोवराची पाणी पातळी दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्यामुळे सरोवराच्या खाणाखुणा मिटण्याची भीती निर्माण झाली आहे. वेळीच शासनाने उपाययोजना न केल्यास धोका अटळ आहे. संभाव्य धोके लक्षात घेत नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. २८ जानेवारीला कमळजा माता सेवा संघ, सर्पक्षीय व नागरिकांनी लोणार बंद पुकारला. दिवसभर व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती.

Save Lonar Lake

वाढत्या जलपातळीमुळे महादेवाची विविध हेमाडपंथी प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. आता कमळजा माता मंदिरही अर्ध्यापर्यंत पाण्याखाली गेले आहे. यामुळे मंदिरात दर्शनाला जाता येत नाही. हे मंदिरही बुडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शासनाने आता काळजी केली नाहीतर लोणार पर्यटनदृष्ट्या लयास जावू शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या सहा  महिन्यांपासून पाण्याची पातळी वाढतच चालली आहे. जिल्हा प्रशासनाने लोणारचे महत्त्व समजून उपाययोजना करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, कमळजा माता सेवा संघाचे कार्यकर्ते आणि नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
बुधवार, २८ जानेवारीला लोणार शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सरोवर वाचवा, अशी हाक देण्यात आली. लोणारच्या नगराध्यक्षा मीरा मापारी, काँग्रेस नेते भूषण मापारी, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख गोपाल बच्छीरे यांच्यासह विविध पक्षांचे नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनीही यासंदर्भात सातत्याने आवाज उठविला आहे. लोणार सरोवर वाचविण्याच्या मागणीसाठी आता आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून २८ जानेवारीला लोणार शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत सर्वच प्रतिष्ठाने बंद होती.

अद्भूत आश्चर्य

लोणार सरोवर हे जागतिक स्तरावरचे आश्चर्यकारक आहे. कित्येक संशोधकांनी येऊन संशोधन केले आहे. अजूनही सरोवरातील अनेक बाबी स्पष्ट झालेल्या नाहीत. संशोधन चालूच आहे. आता तर आव्हान देणारी पाणीपातळी नवे संकट घेऊन आली आहे. त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे.

मूळ स्वरूप बदलण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, सरोवराची पाणीपातळी सुमारे २० ते २५ फुटांनी वाढल्याने पाण्याचे मूळ स्वरूप  बदलू लागले आहे. पूर्वी ११.५ असलेला पीएच स्तर ७.५ पर्यंत खाली आला असून, क्षारता ६००० वरून ४०० पर्यंत घसरली आहे. त्यामुळे येथील दुर्मिळ जैवविविधता धोक्यात आली आहे.

नैसर्गिक झरे प्रवाहित

विराज धारतीर्थ व रामगया हे नैसर्गिक घरे मोठ्या प्रमाणावर प्रभाहित झाले आहेत. पावसाळ्यात तर पाण्याची आवक जास्तच होती. सरोवरात जाणारे गोड पाणी काठावरच अडवून उपसा सिंचन व वॉटर लिफ्टिंगद्वारे लोणार शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्यात यावे,  शहरातील सांडपाणी सरोवरात जाण्यापासून रोखण्यासाठी कायमस्वरूपी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करावा, अशा   मागण्यांसाठी लोणार बंद पाळण्यात आला.

Save Lonar Lake

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top