Bhim Army takes an aggressive stance in protest against the lathi-charge on students : लाठीमाराच्या निषेधार्थ भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने बुलढाण्यात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात शनिवार, २५ जुलै रोजी हे आंदोलन होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी आंदोलन
युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : सतीश पवार
बुलढाणा : दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कथितपणे केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने बुलढाण्यात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात शनिवार, २५ जुलै रोजी हे आंदोलन होणार आहे. यात युवा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि युवक आंदोलन करत होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात आली असून, काही व्यक्ती साध्या वेशात आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना मारहाण करत असल्याचेही आरोप समोर आले आहेत.
या घटनेचा निषेध व्यक्त करत भीम आर्मीने बुलढाण्यात धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनातून विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अत्याचाराचा निषेध नोंदविण्यात येणार असून, संबंधितांवर कारवाई करण्याची तसेच विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सतीश पवार यांनी सांगितले.
सतीश पवार म्हणाले की, लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार आहे. विद्यार्थ्यांच्या आवाजाला दडपण्यासाठी बळाचा वापर करणे अत्यंत निषेधार्ह आहे. या घटनेविरोधात बुलढाण्यातील युवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकशाहीची बाजू मजबूत करावी..भीम आर्मीच्या वतीने सर्व सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाविरोधात एकजूट दाखवून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सतीश पवार यांनी केले आहे.


