Prof. Dr. Satish Shelke Awarded Ph.D. Degree : प्रा. डॉ. सतीश शेळके यांना पीएच.डी. पदवी प्रदान: संशोधन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान

बुलडाणा: शिरपूर येथील सुपुत्र, प्रा. डॉ. सतीश शेळके यांना फार्मास्युटिकल सायन्सेस या विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाने केवळ त्यांच्या वैयक्तिक कारकिर्दीतच नव्हे, तर संशोधन क्षेत्रातही एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ओरिएंटल युनिव्हर्सिटी, इंदोर यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, डॉ. शेळके यांना ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ या प्रतिष्ठेच्या पदवीसाठी पात्र घोषित करण्यात आले आहे.
डॉ. शेळके यांनी “अनॅलिटीकल मेथड डेव्हलपमेंट, व्हॅलिडेशन अँड इम्प्युरिटी प्रोफाईलिंग ऑफ अँटी-डायबेटिक ड्रग्स” या महत्त्वपूर्ण विषयावर आपला संशोधन प्रबंध सादर केला. या संशोधनामध्ये त्यांनी मधुमेहावरील औषधांच्या विश्लेषणासाठी आधुनिक विश्लेषणात्मक पद्धतींचा विकास आणि प्रमाणीकरण यावर सखोल अभ्यास केला. विशेषतः, औषधांमधील अशुद्धींचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन करून त्यांनी या क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. त्यांच्या या संशोधनामुळे औषधनिर्मिती आणि गुणवत्ता नियंत्रणामध्ये नवीन दिशा मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
या संशोधनासाठी त्यांना प्रा. डॉ. नितू सिंह यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. डॉ. शेळके यांनी केवळ अध्यापनातच नव्हे, तर संशोधन क्षेत्रातही सातत्यपूर्ण योगदान दिले आहे. त्यांची अनेक संशोधनपर लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. फार्मास्युटिकल ॲनालिटीकल मेथड डेव्हलपमेंट, व्हॅलिडेशन आणि इम्प्युरिटी प्रोफाईलिंग या क्षेत्रांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे.
या महत्त्वपूर्ण यशाबद्दल राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी, बुलडाणाचे प्राचार्य डॉ. शिरीष जैन आणि संस्थेचे अध्यक्ष मा. धुरपतरावजी सावळे साहेब यांनी डॉ. सतीश शेळके यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधनात्मक यशाबद्दल कौतुक करताना, त्यांनी डॉ. शेळके यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. डॉ. शेळके यांचे हे यश नवोदित संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.


