Tree collapses; disaster averted. : झाड कोसळले अनर्थ टळला

बुलढाणा : शहरातील खामगाव मार्गावर सुंदरखेड भागात बाभळीचे झाड कोसळल्याने शुक्रवारी सकाळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या परिसरात कुणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
गुरुवारी पहाटेपासून संततधार पाऊस सुरू होता. सायंकाळपासून पावसाने जोर धरला. हा पाऊस दुसऱ्या दिवशी शुक्रवारीदेखील चालूच होता. सुंदरखेड भागात सेंट जोसेफ स्कूलच्या पुढे खामगावकडे जाताना गुरुवारी रात्री बाभळीचे झाड पावसामुळे उन्मळून पडले. या झाडाशेजारीच काही दुकाने आहेत. याशिवाय बाजूने थोड्या अंतरावर लहान मुलांचा शिकवणी वर्ग होता. दिवसाच्या वेळी हे झाड कोसळले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, घटना घडली त्यावेळी हा भाग निर्मनुष्य होता.
शुक्रवारी सकाळपासून वाहनांची वर्दळ सुरू झाली. मात्र, समोर जाता येत नसल्याने वाहतूक ठप्प झाली होती. काही नागरिकांनी कुऱ्हाडीने पडलेल्या झाडाच्या फांद्या तोडल्याने एका बाजूने वाहतूक सुरू झाली.

