mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

काकाची हत्या करणारा पुतण्या समाधानला जन्मठेप : Nephew Samadhan gets life imprisonment for murdering uncle

शेअर करा :
Nephew Samadhan gets life imprisonment for murdering uncle : 
शेतीचा वाद; काकाची हत्या करणारा पुतण्या समाधानला जन्मठेप

Nephew Samadhan gets life imprisonment for murdering uncle


कुंबेफळ येथील शेषराव जाधव हत्येप्रकरणी न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांचा महत्त्वपूर्ण निकाल

बुलढाणा : शेतीच्या वादातून सख्ख्या काकाची हत्या करणाऱ्या कुंबेफळ येथील पुतण्या समाधान जाधव याला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
बुलढाणा तालुक्यातील कुंबेफळ येथील मृत शेषराव रामा जाधव (वय ६०) हे २९ ऑक्टोबर २०२२ रोजी शेतात काम करीत होते. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर मुलगा विलास जाधव आवाजाच्या दिशेने धावत गेला असता दादाराव पंडित जाधव व आशा साईनाथ बुडगुजर यांनी शेषराव जाधव यांना पकडून ठेवल्याचे व मुख्य आरोपी समाधान पंडित जाधव हा धारदार चाकूने वडिलांच्या पोटात, छातीवर व दोन्ही पायावर वार करताना दिसला. विलासने आरडाओरड केली असता सर्व आरोपी पळून गेले. शेषराव जाधव हे गंभीर जखमी झाले.
त्यांच्या पोटातील आतडे बाहेर पडले होते. त्यांचा मृत्यू झाला. गुन्हा केल्यानंतर आरोपीने अंगावरील रक्ताने माखलेला शर्ट त्याची आई आनंदाबाई जाधव हिला जाळण्यास सांगितला. तो शर्ट तिने शेतातील बांधावर जाळल्याचे आढळून आले. त्या अनुषंगाने विलास जाधव याने पोलिसांत तक्रार दिली. तत्पूर्वीच आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते.
या प्रकरणी धाड पोलिसांनी भादंवि कलम ३०२, २०१ सह कलम ३४ नुसार गुन्हा दाखल केला. ३० ऑक्टोबर २०२२ रोजी समाधान पंडित व त्याचा भाऊ दादाराव यास अटक करण्यात आली. पोलीस कोठडीत असताना आरोपी समाधान याने गुन्ह्यात वापरलेला चाकू पोलिसांना काढून दिला. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा व आरोपीच्या कपड्याचे व इतर जप्त नमुन्यांचे वेगवेगळे जप्ती पंचनामे केले. महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आलेे. तर जप्त केलेला मुद्देमाल धाड पोलिसांनी रासायनिक विश्लेषणाकरिता अमरावती येथे पाठविला असता आरोपी समाधान जाधव याचे पॅण्ट व बुटावरील व गुन्ह्यात वापरलेल्या चाकूवरील रक्त मृतक शेषराव जाधव यांचेच असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. सबळ पुरावा मिळाल्यानंतर पोलिसांनी समाधान जाधव, दादाराव जाधव, आशाबाई बडगुजर व आनंदीबाई जाधव यांच्याविरुद्ध विद्यमान न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले तेव्हा आरोपी समाधान जाधव व दादाराव जाधव हे दोन्ही आरोपी कारागृहात बंदी होते. तर आशाबाई बडगुजर व आनंदाबाई जाधव यांना जामिनावर सोडण्यात आले होते.
आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील वसंत भटकर यांनी नऊ साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी विलास जाधव, घटनास्थळ व जप्ती पंच, डॉ. निवृत्ती देवकर, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल पाटील व इतर साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. तर घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सरकारी पक्षाच्या वतीने आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी ॲड. वसंत भटकर यांनी प्रभावी युक्तीवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी आरोपी समाधान जाधव यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा केली. दंडातील रकमेपैकी आठ हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून फिर्यादीस देण्याचे आदेश दिले. इतर आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली.
तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अनिल पाटील व कोर्ट पैरवी म्हणून पीएसआय रमेश चव्हाण यांनी सरकार पक्षास मदत केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top