Two accused arrested in burglary case : दुकानाचे लॉक तोडून चोरी करणाऱ्या टोळीचा मालेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

१२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त : मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई
मालेगाव : दुकानाचे लॉक तोडून चोरी करणाऱ्या टोळीचा मालेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून विना परवाना गॅस सिलेंडर, किराणा साहित्य, सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर, कॉपर वायर, पाण्याची मोटर, बॅटरी तसेच गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार असा तब्बल 12 लाख 20 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पांगरी कुटे येथील बसस्थानक परिसरात गजानन हरिभाऊ कुटे (वय 46) यांचे महाराष्ट्र मोटर वाइंडिंगचे दुकान आहे. 20 ऑगस्टच्या रात्री 9 ते 21 ऑगस्टच्या सकाळी 8 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लॉक तोडून 358 रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी मालेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 531/2026 नुसार कलम 305(a), 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सुलतानपूर-बिबी रोडवरील खापरखेडा फाट्याजवळील हॉटेल रामभरोसे येथे पोलिसांनी छापा टाकला. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये विविध ठिकाणांहून चोरी केलेले साहित्य आढळून आले.
यामध्ये विना परवाना गॅस सिलेंडर, किराणा सामान, सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर, चोरीचे साहित्य, हॉटेल-धाब्यावरील भांडी, कॉपर वायर, पाण्याची मोटर, बॅटरी आणि चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 12 लाख 20 हजार 770 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी रामनारायण डिंगाबर चव्हाण (रा. खापरखेडा, ता. लोणार, जि. बुलढाणा) आणि हमीद खा शाबास खा (वय 42, रा. सावजी गल्ली, डोणगाव, जि. बुलढाणा) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून आणखी चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता असून, पुढील तपास पोहेकॉ सचिन कल्ले करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश खेरडे, पोहवा सुनील पवार, शिवाजी काळे, जयशंकर पाटील, पोकॉ अमोल पवार, वैभव झरकर, गणेश मेटांगळे आणि योगेश इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

