94.3% voter turnout for BDCC Bank; fate of 23 candidates to be decided on Monday : बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या नऊ संचालक पदांसाठी २३ ऑगस्टला जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडली. ९४.३ टक्के मतदान झाले. १७५१ मतदारांनी २३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला मतपेटीत बंद केला असून, २४ ऑगस्टला त्याचा निकाल बाहेर येणार आहे.

संचालकांच्या नऊ पदांसाठी सहकार-अजितदादा पॅनलमध्ये चुरस : २३ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार
बुलढाणा : जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या नऊ संचालक पदांसाठी २३ ऑगस्टला जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडली. ९४.३ टक्के मतदान झाले. १७५१ मतदारांनी २३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला मतपेटीत बंद केला असून, २४ ऑगस्टला त्याचा निकाल बाहेर येणार आहे. सहकार विद्या मंदिर सभागृहात मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीत आधीच २१ पैकी बारा संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. आता नऊ संचालकांच्या जागांसाठी मतदान घेण्यात आले. सहकार पॅनलचे आठ, अजित दादा शेतकरी परिवर्तन पॅनलचे आणि अपक्ष आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. माजी मंत्री तथा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वर्चस्वाखाली आतापर्यंत ही बँक चालत होती. अवसायनात निघाल्यानंतर बँकेची तब्बल अठरा वर्षांनी निवडणूक होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शिंगणे यांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार मनोज कायंदे यांनी ताकदीने तयारी करीत पॅनल निवडणूक आखाड्यात उतरविले. बिनविरोधच्या खेळीमधून अजित दादा पवार यांच्या पक्षातील संचालकांना अलगद बाहेर फेकल्यामुळे सहकार पॅनलच्या उमेदवारांना धूळ चारण्यात कायंदे कितपत यशस्वी ठरतात हे निकालांती स्पष्ट होणार आहे.
प्रहरातील मतदान
सकाळी दहा वाजेपर्यंत २५८ (१३.९ टक्के), दुपारी बारापर्यंत ७५५ (४०.७), दुपारी दोन पर्यंत १३७२ (७३.८) व सायंकाळी पाच वाजेपर्यंत १७५१ (९४.३ टक्के) मतदारांनी मतदान केले.
१०६ मतदारांनी फिरविली पाठ
१८५७ मतदारांपैकी १७५१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र १०६ मतदारांनी सहकारातील महत्त्वपूर्ण मतदान करण्यात रस दाखविला नाही. बुलढाणा तालुक्यात ८९.५, चिखली तालुक्यात ९५.२, मलकापूर ९४.७, मोताळा ९५.३, नांदुरा ९५.८, शेगाव ९४.२, खामगाव ९४.२, जळगाव जामोद ९१.३, संग्रामपूर ९१.२, मेहकर ९७.२, लोणार ९८.१, सिंदखेड राजा ९७.७ आणि देऊळगाव राजा तालुक्यात ९६.५ टक्के मतदान झाले.

