Struck the biological father on the head with a blowpipe. : जन्मदात्याच्या डोक्यात घातली फुंकणी

बोकड विकल्याचा जाब विचारला म्हणून मुलाने केली हत्या
चिखली : बोकड का विकला, असा जाब विचारला म्हणून व्यसनी मुलाने जन्मदात्या बापाची डोक्यात फुंकणीने प्रहार करून हत्या केली. चिखली तालुक्यातील नायगाव बुद्रुक येथे २९ ऑगस्टच्या रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी मुलास तातडीने अटक केली..
कचरूबा वामन गायकवाड (वय ६०) यांना मुलगा विनोद गायकवाड (४०) याने जगातून कायमचे उठविले. आरोपी विनोद हा दारूच्या आहारी गेला आहे. वडिलांना त्यामुळे २९ ऑगस्टला रात्री अकरा वाजता बाप लेकामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. यावेळी रागाच्या भरात मुलाने पुढील कचरूबा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच डोक्यात लोखंडी फुंकणी मारून वडिलांचा जीव घेतला.
डोक्यात घाव बसल्यामुळे कचरुबा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. घरातील व परिसरातील लोकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली अमडापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग राजपूत यांच्या पथकाने आरोपी विनोद गायकवाड यास अटक केली.या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप करत आहेत.


