Kalyani Bhakare receives the ‘Rashtramata Maa Jijau Nari Samman’ Award. : गरजू महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविणाऱ्या कल्याणी भाकरे यांना ‘राष्ट्रमाता माँ जिजाऊ नारी सन्मान’ पुरस्कार

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड; विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्याची दखल
बुलढाणा : समाजातील गरजू महिला व मुलींना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कल्याणी अमोलराव भाकरे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रमाता माँ जिजाऊ नारी सन्मान’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या सामाजिक व महिला सक्षमीकरणाच्या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.
दरवर्षी साखरखेडी येथे दिवंगत वृक्षमित्र मधुकर खंडारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावर्षी राज्यभरातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचे ५०० पेक्षा अधिक प्रस्ताव पुरस्कारासाठी प्राप्त झाले होते. त्यामधून कल्याणी भाकरे यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
कल्याणी भाकरे या प्रोफेशनल फॅशन डिझायनर व आर्टिस्ट असून त्यांनी अनेक गरजू महिला व मुलींना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेष म्हणजे, आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असलेल्या मुलींना त्या मोफत प्रशिक्षण देत असून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देतात.
त्यांच्याकडून मशीन क्लासेस, केक क्लासेस, मेहंदी, बेकिंग, मेकअप, रांगोळी, मॅट यांसह विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून महिलांना केवळ प्रशिक्षणच नव्हे, तर स्वयंरोजगाराचा मार्ग दाखवून आत्मनिर्भर बनविण्याचे कार्य त्या सातत्याने करीत आहेत.
त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘राष्ट्रमाता माँ जिजाऊ नारी सन्मान’ राज्यस्तरीय पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराची निवड समिती मुख्य संयोजक सचिन खंडारे, अध्यक्ष विकास सुखदाने, उपाध्यक्ष समाधान सरकटे आणि सचिव राधेश्याम बेंगाळे यांनी केली आहे.
महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कल्याणी भाकरे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


