Athletes Honoured in Buldhana : राष्ट्रीय क्रीडा दिन: बुलढाण्यात खेळाडूंचा गौरव, क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन

बुलढाणा, दि ३ : हॉकीचे जादूगार, मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी देशभरात ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा केला जातो. यावर्षीही बुलढाणा जिल्ह्यात या दिनाचे औचित्य साधून क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि नागरिकांमध्ये क्रीडाविषयक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित या उपक्रमांमध्ये ७५ हून अधिक राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान करण्यात आला, तर २५० हून अधिक खेळाडूंनी विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.
तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन
२८ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा आणि उपक्रम राबवण्यात आले. या तीन दिवसीय महोत्सवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन, त्यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्याने, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सत्कार, तसेच मान्यवरांकडून खेळाडूंना मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात आली होती. भारतीय खेल प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली २८ ऑगस्ट रोजी ‘२९ चॅलेंज’, ‘पास द बॉल’ आणि ‘स्पोर्ट्स बंधन’ यांसारख्या अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. २९ ऑगस्ट रोजी ‘एक तास खेळाच्या मैदानात’ या उपक्रमांतर्गत मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहण्यात आली, तर ३० ऑगस्ट रोजी ‘संडे ऑन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान आणि प्रेरणा
या कार्यक्रमांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सन २०२५-२६ मध्ये शालेय तसेच अधिकृत एकविध खेळ संघटनांमार्फत आयोजित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या आणि सहभाग घेतलेल्या खेळाडूंचा जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. हा सन्मान खेळाडूंना भविष्यात आणखी उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देणारा ठरला.
उद्घाटन आणि समारोप सोहळा
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलढाणा येथे झाले. या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कारार्थी चंद्रकांत इलक, हॉकी मार्गदर्शक सय्यद आबिद आणि क्रीडा शिक्षक रविंद्र गणेशे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढवले.
कार्यक्रमाचा समारोप १ सप्टेंबर रोजी एका विशेष सोहळ्याने करण्यात आला. या समारोप प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे, राखीव पोलीस निरीक्षक विकास तिडके आणि प्राध्यापक डॉ. मनोज व्यवहारे यांच्या उपस्थितीत खेळाडूंचा सत्कार व सन्मान करण्यात आला. युवा पुरस्कारार्थी डॉ. गायत्री सावजी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांनी प्रास्ताविक केले. राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. जीवन मोहोड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
बुलढाणा जिल्ह्यातील या यशस्वी आयोजनामुळे क्रीडा संस्कृतीला बळकटी मिळाली असून, युवा पिढीला खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतींना उजाळा देत, या कार्यक्रमांनी खेळाचे महत्त्व आणि खेळाडूंचा सन्मान अधोरेखित केला.


