MSEDCL’s historic achievement : महावितरणची ऐतिहासिक कामगिरी: देशात प्रथमच बॅटरीत साठवून केला जात आहे १००० मेगावॅटचा वीजपुरवठा

बुलढाणा प्रतिनिधी दि ३० : राज्याच्या वीज वितरण क्षेत्रात एका नव्या पर्वाचा आरंभ झाला असून, महावितरणने बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिमच्या (बीईएसएस) माध्यमातून तब्बल १००० मेगावॅट अवर वीज साठवणुकीचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. देशात प्रथमच अशा प्रकारे विकेंद्रित स्वरूपात बॅटरीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा करणारी महावितरण ही देशातील पहिलीच वीज कंपनी ठरली आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या दुष्काळी परिस्थिती आणि वाढलेल्या उष्णतेच्या काळात हा उपक्रम जनतेसाठी अत्यंत दिलासादायक ठरत आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही राज्य शासनाची एक अत्यंत महत्त्वाची आणि गेमचेंजर योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत राज्यात आतापर्यंत सुमारे ७ हजार मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. या प्रकल्पांतून दिवसा मिळणारी अतिरिक्त सौरऊर्जा आणि ग्रीडद्वारे उपलब्ध होणारी स्वस्त वीज आता बॅटरीमध्ये साठवून ठेवण्यात येत आहे. सायंकाळी जेव्हा विजेची कमाल मागणी असते, त्यावेळी ही साठवलेली वीज वापरली जात आहे. अलीकडेच कार्यान्वित करण्यात आलेल्या ५०० मेगावॅट क्षमतेच्या बॅटरी स्टोरेजमधून दोन तास वीज मिळत असल्याने एकूण १००० मेगावॅट अवर इतकी क्षमता उपलब्ध झाली आहे.

सध्या एल निनोच्या प्रभावामुळे अपुरा पाऊस आणि ऑक्टोबरमधील तीव्र उष्णतेमुळे विजेची मागणी उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. दिवसा सौरऊर्जेमुळे किफायतशीर दरात वीज मिळत असली, तरी सायंकाळी सौरऊर्जा उपलब्ध नसल्यामुळे यापूर्वी महागड्या दराने वीज खरेदी करावी लागत होती. मात्र, महावितरणच्या या नाविन्यपूर्ण बॅटरी स्टोरेज प्रकल्पामुळे सायंकाळच्या वेळी निर्माण होणारी वीजटंचाई आणि आर्थिक भार दोन्ही टळले आहेत.
महावितरणच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा विस्तार वेगाने सुरू आहे. एकूण ७५० मेगावॅट क्षमतेचे बॅटरी साठवणूक प्रकल्प उभारण्याचे नियोजन असून, त्यापैकी १००० मेगावॅट अवरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित प्रकल्पांचे काम आगामी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच, भविष्यात ४००० मेगावॅट अवर क्षमतेचे प्रकल्प उभारण्याचे कामही वेगाने प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पांमुळे सायंकाळच्या पीक अवर्समध्ये (कमाल मागणीच्या वेळी) खात्रीशीर वीजपुरवठा मिळणे शक्य होणार असून, बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरात वीज उपलब्ध होत असल्यामुळे आगामी उन्हाळ्यात या योजनेचा मोठा फायदा होईल.
राज्यात एकूण ५० ठिकाणी प्रत्येकी १० मेगावॅट क्षमतेचे हे बॅटरी स्टोरेज प्रकल्प उभारण्यात आले आहेत. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून, याद्वारे सौर ऊर्जेची साठवणूक करून संकटसमयी तिचा प्रभावी वापर करणे महावितरणला शक्य झाले आहे. या विक्रमी कामगिरीमुळे महावितरणने देशातील इतर वीज कंपन्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.


