
बुलढाणा : निराधार, बेघर आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींच्या सेवेसाठी गेल्या १४ वर्षांपासून अविरत कार्य करणारे दिव्या फाउंडेशनचे संस्थापक व संचालक अशोक काकडे यांना प्रतिष्ठेचा ‘पुष्पा नथानी पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय आणि नि:स्वार्थ सेवाकार्याची दखल घेत सेवादीप सेवा दीप आणि रिल्फोर फाउंडेशन यांच्या वतीने त्यांना हा सन्मान देण्यात आला. या पुरस्कारासोबत १० लाख रुपयांची पुरस्कार राशी प्रदान करण्यात आली.
५ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित पुरस्कार सोहळ्यात सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे आणि रिल्फोर फाउंडेशनचे चेअरमन दीपक नथानी यांच्या हस्ते अशोक काकडे यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा सन्मान दिव्या फाउंडेशनच्या सेवाकार्यासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद ठरला.
१४ वर्षांची मानवसेवा, ६७२ जणांचे यशस्वी पुनर्वसन
अशोक काकडे आणि त्यांच्या पत्नी ज्योती काकडे यांनी स्वत:चे आयुष्य निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. वरवंड येथील दिव्य सेवा निवासी उपचार व पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून रस्त्यावर भटकणाऱ्या, बेघर, निराधार माता-भगिनी आणि प्रभुजींना सुरक्षित निवारा, दोन वेळचे पौष्टिक भोजन, औषधोपचार, वैद्यकीय सेवा आणि मायेचा आधार दिला जातो.
आजपर्यंत या प्रकल्पातून ६७२ निराधार मनोरुग्णांना उपचार व पुनर्वसनानंतर त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यात यश आले आहे.
ज्यांना समाजाने नाकारले, ज्यांच्या आयुष्यात मायेचा आधार उरला नव्हता, अशा व्यक्तींना पुन्हा कुटुंबाचे प्रेम आणि सन्मानाने जगण्याची संधी देण्याचे कार्य दिव्या फाउंडेशन करत आहे.


