Major bus accident averted : मलकापूर ते कुऱ्हा गोतमारा मार्गावर एसटी बसचा होणारा मोठा अपघात थोडक्यात टळला.

रस्त्याच्या कडेला कलंडली, पण झाडींना अडकली : दहा प्रवासी किरकोळ जखमी
मोताळा : मलकापूर ते कुऱ्हा गोतमारा मार्गावर एसटी बसचा होणारा मोठा अपघात थोडक्यात टळला. मातीच्या भरावाने चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला कलंडली. मात्र झाडीझुडपांमुळे अडकल्याने जीवितहानी टळली. १० ते १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले. गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
मलकापूर ते कुऱ्हा गोतमारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. एमएच-४०-एन-९४८६ क्रमांकाची बस गोतमारा येथून मलकापूरकडे प्रवासी घेऊन निघाली होती. रस्त्यावरील खड्डे आणि मातीचा अंदाज न आल्याने बस खेडी आणि कोऱ्हाळादरम्यान रस्त्याशेजारील मोठ्या चारीत बस उतरली.

रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. कामासाठी रस्त्यावर टाकलेल्या मातीच्या भरावाचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याशेजारील चारीत उतरली. या घटनेमुळे प्रवाशांनी एकच आरोळी ठोकली. आता मोठा अपघात घडणार म्हणून प्रवासी भयभीत झाले होते. जखमी प्रवाशांवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.

