Take strict action to recover arrears of revenue and minor mineral fines : जिल्ह्यातील प्रलंबित जमीन महसूल आणि थकीत करांची शंभर टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महसूल यंत्रणेला विशेष निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे महसूल यंत्रणेला निर्देश
बुलढाणा : जिल्ह्यातील प्रलंबित जमीन महसूल आणि थकीत करांची शंभर टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महसूल यंत्रणेला विशेष निर्देश दिले आहेत. महसूल वसुलीची प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी आता प्रशासनाकडून सक्तीने वसुली करण्यात येणार असून, थकबाकीदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. विशेषतः गौणखनिजाचा अवैध उपसा करणाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकारी पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, अशा प्रकरणात प्रलंबित असलेले सर्व दंड त्वरित वसूल करण्याचे आणि दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यंत्रणेला दिले.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महसूल विभागाच्या बैठकीत स्पष्ट केले की, ‘महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६’ मधील तरतुदींनुसार थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीसारखी कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
पथकांना अलर्ट राहण्याचे आदेश
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकांना गावोगावी भेटी देऊन थेट वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रलंबित कर आणि गौणखनिज अवैध उपशाचा दंड भरण्यासाठी वारंवार मुदत देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्यावर कठोर पावले उचलण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी प्रशासकीय कारवाई आणि दंडात्मक बोजा टाळण्यासाठी आपला थकीत जमीन महसूल, कर आणि गौणखनिजाचा दंड त्वरित जमा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
दररोज घेणार वसुलीचा आढावा
ही मोहीम आता अधिक तीव्र करण्यात आली असून, गाव पातळीवर दररोज वसुलीचा आढावा घेतला जाणार आहे. शासकीय महसूल आणि गौणखनिजावरील दंड हा विकासकामांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने सर्व स्तरावर ही वसुली प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी दिल्या आहेत.

