Arrival of the deitys palanquin on Tuesday : संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूर येथून शेगावकडे परतीच्या प्रवासाला निघाली असून, ११ ऑगस्टला विदर्भ सीमेवर सिंदखेड राजा तालुक्यात आगमन होत आहे. सिंदखेड राजा येथे स्वागत व मुक्काम झाल्यानंतर पालखी लोणार येथे थांबणार आहे.

पालखी मार्गावरील वाहतूक एक दिवसासाठी वळविणार : ठाणेदार आलेवार यांची माहिती
मेहकर : संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूर येथून शेगावकडे परतीच्या प्रवासाला निघाली असून, ११ ऑगस्टला विदर्भ सीमेवर सिंदखेड राजा तालुक्यात आगमन होत आहे. सिंदखेड राजा येथे स्वागत व मुक्काम झाल्यानंतर पालखी लोणार येथे थांबणार आहे. १४ ऑगस्ट रोजी सुलतानपूरमार्गे रात्री मेहकर नगरीत शारंगधर बालाजी नगरी येथे मुक्कामी थांबणार आहे. पालखीच्या दर्शनासाठी मेहकर पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त मेहकर येथे जमणार आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतुकीच्या नियोजनासाठी पालखी मार्गावरील मेहकर शहरातील वाहतूक १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपासून १५ ऑगस्टच्या सकाळी १० वाजेपर्यंत वळविण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणेदार व्यंकटेश आल्यावर यांनी दिली.
वाहतूक वळविण्यासंदर्भात एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना व ट्राफिक पोलीस अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. सिंदखेड राजा कडून सुलतानपूर मार्गे मेहकर शहराकडे येणाऱ्या सगळ्या बसेस सिंदखेड राजा-देऊळगाव राजा तसेच चिखली-अमडापूर मार्गे तर चिखली लव्हाळा मार्गे मेहकर कडे येणारी वाहतूक चिखली लव्हाळा अमडापूर मार्गे व वाशीम, मालेगाव, डोणगाव, मेहकर मार्गे सुलतानपूरकडे जाणारी वाहतूक खंडाळा बायपास, सोनाटी बायपास, लोणार फाटा मार्गे चिखली आणि जानेफळ कडून मेहकरकडे येणारी वाहतूक जानेफळ रोड, डोणगाव रोड, डी. पी. रोड मार्गे बसस्टँड मेहकर कडे वळविण्यात येणार असल्याचे ठाणेदार आलेवार यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३१ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याबाबत खाजगी वाहन मालक आणि प्रवाशांनी नोंद घेऊन गैरसोय टाळावी, असे आवाहन ठाणेदार आलेवार यांनी केले आहे.

