Buldhana Police’s ‘Sunday on Cycle’ initiative held with enthusiasm :बुलढाणा पोलिसांचा ‘Sunday On Cycle’ उपक्रम उत्साहात; फिट इंडिया संकल्पनेला मिळाला बळ

बुलढाणा : भारत सरकारच्या फिट इंडिया अभियानाला आणि जागतिक सायकल दिनाच्या उद्दिष्टांना अनुसरून बुलढाणा जिल्हा पोलिस दलातर्फे ‘Sunday On Cycle’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांची विशेष उपस्थिती लाभली.
पोलीस मुख्यालय, बुलढाणा येथील कवायत मैदानावर आयोजित कार्यक्रमात जिल्हा पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि सायकलप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना फिट इंडिया संकल्पनेचे महत्त्व विशद केले. नियमित सायकलिंगमुळे शारीरिक तंदुरुस्ती, आरोग्य संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाला चालना मिळते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमांतर्गत आयोजित सायकल रॅलीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी, पोलीस अधीक्षक निलेश तांबे तसेच अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. त्यानंतर मान्यवरांनी स्वतः सायकल चालवत रॅलीत सहभाग घेतला.
ही रॅली पोलीस मुख्यालयातून सुरू होऊन कारंजा चौक, त्रिशरण चौक, सुंदरखेड स्टेट बँक मार्गे पुन्हा पोलीस मुख्यालयात दाखल झाली. रॅलीदरम्यान नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि सायकल क्लब सदस्यांना मार्गदर्शन करत नियमित व्यायाम व सायकलिंगचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) बाळकृष्ण पावरा, बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संग्राम पाटील, बुलढाणा ग्रामीणचे निरीक्षक गजानन कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी आशीष रोही यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे बुलढाणा जिल्ह्यात फिटनेस, पर्यावरण संरक्षण आणि सायकल संस्कृतीला प्रोत्साहन मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


