Father asked for 40 tolas of gold by faking kidnapping! : मुलाचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच आई, वडील काळजीत पडले. मात्र, पोलीस तपासात मुलगाच अपहरणाचा सूत्रधार निघाला. त्याने मित्रांच्या मदतीने वडिलांना ४० तोळे सोन्याची खंडणी मागितली.

मेहकर तालुक्यातील खळबळजनक घटना : बीएससी फर्स्ट इअरला शिकणाऱ्या उच्चशिक्षित मुलाचा मित्रांसोबत बापाला लुटण्याचा प्लॅन
आसिफ शाह
मेहकर : मुलाचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच आई, वडील काळजीत पडले. मात्र, पोलीस तपासात मुलगाच अपहरणाचा सूत्रधार निघाला. त्याने मित्रांच्या मदतीने वडिलांना ४० तोळे सोन्याची खंडणी मागितली. मेहकर पोलिसांनी अवघ्या बारा तासांत हिवरा आश्रम (विवेकानंद नगर ) येथील तरुणाच्या अपहरणाचा बनाव उघड केला.
मेहकर तालुक्यातील रायपूर येथील जनार्दन काळे यांनी ६ मे २०२६ रोजी मेहकर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, त्यांचा मुलगा चेतन जानार्धन काळे (वय १९) हा ६ मे रोजी BSc चे पेपर देण्यासाठी ब्रह्मपुरी फाटा येथील छगन भुजबळ महाविद्यालयात गेला होता. तो घरी परतला नाही. मुलाचे वडील जनार्धन काळे यांना त्याचा मुलगा चेतन काळे याच्या मोबाइलवरून दुपारी १ वाजता मॅसेज आला. एका व्हिडीओमध्ये त्यांचा मुलगा चेतन काळे यास बांधलेले दिसले व मेसेजमध्ये तुमचा मुलगा आमच्या ताब्यात असून त्याला जिवंत पहायचे असल्यास ४० तोळे सोने शेगाव रेल्वे स्टेशन येथे दोन तासांत एकट्याने घेऊन येण्याचे सांगीतले. मुलाचे कुणीतरी खंडणीसाठी अपहरण केले असावे म्हणून वडिलांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १४०(२) भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. वडील तसेच चेतन जानार्धन काळे याचे नातेवाईक, मित्र, शिक्षक यांना विचारपूस करून परिसरातील CCTV कॅमेरे चेक करण्यात आले. तांत्रीक तपास तसेच गोपनिय माहितीचे आधारे वेगवेगळे पोलीस पथके तयार वेगवेगळ्या जिल्ह्यात पाठविण्यात आले.
अपहरण झालेला चेतन काळे यास वाकड जि. नाशिक पोस्टे लासलगाव (नाशिक ग्रामिण) हद्दीतून एका शेतातून त्याचे मित्र विवेक सखाराम काकडे (वय २६ वर्ष रा पोखरी फाटा हिवरा आश्रम ता मेहकर ह. मु. नाशिक) याला ताब्यात घेण्यात आले. दोघांना विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी आमची बरीच दिवसांपासून आर्थिक अडचण होती. त्यामुळे बनावट किडनॅपिंग केल्याचे त्यांनी सांगितले.
सदर प्रकरणात आणखी साथीदार असण्याची शक्यता आहे. अधिक तपास एपीआय अशोक अवचार करीत आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर संतोष खाडे, पोनि व्यंकटेश्वर आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी संदिप बिरांजे, सपोनी अशोक अवचार पोउपनि किरण खाडे, संदिप मेंधणे, सफौ सुखदेव गव्हाणे, लक्ष्मण कटक, डीगांबर चव्हाण, विजय बेंडवाल, पोका मोहम्मद परसुवाले, केशव अवचार, विठ्ठल पैठणे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.


