Relief for drought-hit farmers from Union Minister Prataprao Jadhav. : निसर्गाच्या अवकृपेला सरकारची साथ: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

बुलढाणा, दि ५ : निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाने ओढ दिल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पेरणीनंतर बहरलेली पिके आता पाण्याअभावी सुकू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर अंधार दाटला आहे. याच पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि त्यांना धीर दिला. “पाऊस नाही ही निसर्गाची अकृपा आहे, पण खचून जाऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे,” असे आश्वस्त करणारे शब्द त्यांनी शेतकऱ्यांशी बोलताना उच्चारले.

यावर्षी जून महिन्याच्या अखेरीस पावसाळ्याला उशिरा सुरुवात झाली. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकरी आनंदात होते आणि त्यांनी मोठ्या उत्साहात पेरण्या केल्या. पिकेही जोमाने वाढू लागली होती. मात्र, गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने शेतातील पिके आता अक्षरशः करपू लागली आहेत. बुलढाणा जिल्ह्यात तब्बल ३ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. सोयाबीनला फुले येऊन शेंगा धरण्याच्या तयारीत असतानाच पावसाने पाठ फिरवल्याने ४०% सोयाबीन पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे, तर उत्पादनात ५०% घट अपेक्षित आहे.
या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आज खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा, अटाळी, शहापूर, आडगाव, बोरी, शिर्ला आणि नेमाने येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची सद्यस्थिती पाहिली. निसर्गाच्या अवकृपेपुढे आपण काही करू शकत नाही, पण सरकारने शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांच्या नुकसानीची अचूक नोंद घेऊन त्यांना योग्य ती मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा कृषी अधिकारी संतोष डाबरे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष डिवरे, अमोल अंधारे, तालुकाप्रमुख राजू बघे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. प्रतापराव जाधव यांच्या या दौऱ्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. सरकार खरोखरच त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना या संकटातून बाहेर काढेल, अशी आशा आता शेतकरी बाळगून आहेत.


