Sand Mafia Engages in Illegal Sand Transport, Defying the Revenue Department : महसूल विभागाच्या नाकावर टिचून रेती माफियांची अवैध रेती वाहतूक: पोलिसांची धडक कारवाई, ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

अमोल साळवे प्रतिनिधी :
मलकापूर पांग्रा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात रेती माफियांनी महसूल विभागाला अक्षरशः आव्हान दिले आहे. महसूल विभागाच्या डोळ्यांदेखत, त्यांच्या नाकावर टिचून अवैध रेती वाहतुकीचा गोरखधंदा सर्रास सुरू असताना, अखेर मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने धडक कारवाई करत रेती माफियांना चांगलाच दणका दिला आहे. शेंदुर्जन येथे केलेल्या या कारवाईत दोन टिप्परसह तब्बल ४० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची गुप्त माहिती आणि धडक कारवाई
२८ मे रोजी पोहे कॉ डिंगांबर मंगलसिंग चव्हाण यांना गुप्त माहिती मिळाली की, मलकापूर पांग्रा ते शेंदुर्जन मार्गावरून काही टिप्पर चालक विनापरवाना गौण खनिज रेतीची वाहतूक करून चढ्या दराने विक्री करत आहेत. ही माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तातडीने तयार करण्यात आले. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शेंदुर्जन शिवारातील बळीराजा फॅमिली रेस्टॉरंटसमोर पोलिसांनी नाकाबंदी केली. यावेळी दोन संशयित टिप्पर अडवण्यात आले. तपासणीअंती, या वाहनांमध्ये विनापरवाना रेती वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले.
४० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत सिग्मा कंपनीचा टिप्पर (क्र. NL-01-AD-4434) आणि अशोक लेलँड टिप्पर (क्र. MH-28-BB-4099) हे दोन वाहने, तसेच एकूण ६ ब्रास अवैध रेती जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या या सर्व मुद्देमालाची अंदाजे किंमत ४० लाख ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मल्हारी सुदाम भुसारी (रा. बारलिंगा), भगवान तुकाराम धारे (रा. निमगाव गुरु), उमेश रामराव गायकवाड (रा. हिवरखेड पूर्णा) आणि उमेश नामदेव डोईफोडे (रा. बारलिंगा) या चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच गौण खनिज अधिनियम १९५७ अंतर्गत साखरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
या कारवाईमुळे पोलीस विभागाचे सर्वत्र कौतुक होत असले तरी, महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरे तर अवैध गौण खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची आणि कारवाई करण्याची प्राथमिक जबाबदारी महसूल विभागाची आहे. मात्र, पोलीस विभागाला ही कारवाई करावी लागल्याने, महसूल विभाग रेती माफियांवर एवढा मेहरबान का, असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राहेरी येथील पुलाजवळ अवैध रेती वाहतुकीचे वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराला रेती माफियांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असतानाही, सिंदखेडराजा तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसली नव्हती. यामुळे रेती माफियांना अभय मिळत असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये बळावली होती. आता पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे, महसूल विभागाच्या निष्क्रियतेवर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे. महसूल विभागाने आपली जबाबदारी ओळखून अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/
या कारवाईत साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्यासह सुनील देशमुख, उमेश घुगे, किशोर सांगळे, सुनील गाडे, कैलास गाडे, बद्री शिंदे, पंढरीनाथ जाधव, विलास जायभाये आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामदास वैराळ करत आहेत.


