Two guards killed in Wagner collision : हॉटेलवर सुरक्षा गार्डची ड्युटी करीत असताना भरधाव वॅगनार कारच्या चालकाने धडक दिल्याने दोन सुरक्षारक्षकांचा जागीच मृत्यू झाला.

हॉटेलच्या सुरक्षेसाठी होते रस्त्याच्या कडेला तैनात
खामगाव : हॉटेलवर सुरक्षा गार्डची ड्युटी करीत असताना भरधाव वॅगनार कारच्या चालकाने धडक दिल्याने दोन सुरक्षारक्षकांचा जागीच मृत्यू झाला. खामगाव ते नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल पुष्पांजलीसमोर १५ मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
गोविंद किसन शेगोकार (वय ६४) व विवेक देवीदास पायघन (वय ४१) अशी अपघातात ठार झालेल्या सुरक्षारक्षकांची नावे आहेत. दोघेही खामगाव शहरानजीक घाटपुरी येथील रहिवासी होते. १५ मे रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला हॉटेलजवळ कर्तव्यावर असतानाच एमएच १५ जीएफ ८०७३ क्रमांकाच्या वॅगनार कारने गोविंद शेगोकार व विवेक पायघन यांना जोरदार धडक दिली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झाला.
घाटपुरीच्या तक्षशिलानगरमधील रहिवासी राजेंद्र शेगोकार यांच्या तक्रारीवरून वॅगनार कारचालकाविरुद्ध बीएनएस कलम १०६ (१), १२५ (अ) (ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४/१७७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास पोउपनि अमोल पाटे करीत आहेत.


