mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मलकापूर पांग्रा मंडळाच्या ग्रामस्थांचा एल्गार: Villagers of Malkapur Pangra Mandal protest

शेअर करा :

Villagers of Malkapur Pangra Mandal protest : मलकापूर पांग्रा मंडळाच्या ग्रामस्थांचा एल्गार: साखरखेर्डा अपर तहसील कार्यालयात समावेशाला तीव्र विरोध, सिंदखेड राजा तहसील कार्यालयातच कायम ठेवण्याची मागणी

Villagers of Malkapur Pangra Mandal protest


बुलढाणा : राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या ऐतिहासिक सिंदखेड राजाशी भावनिक नाते असलेल्या मलकापूर पांग्रा महसूल मंडळातील 14 गावांनी साखरखेर्डा अपर तहसील कार्यालयात समावेश होण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. या गावांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्री, महाराष्ट्र शासन, मुंबई यांना उद्देशून एक निवेदन सादर केले असून, मलकापूर पांग्रा मंडळाला सिंदखेड राजा तहसील कार्यालयातच कायम ठेवण्याची मागणी केली आहे. या मागणीची पूर्तता न झाल्यास 1 मे 2026 पासून सिंदखेड राजा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

 

गैरसोयीचे कारण काय

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मलकापूर पांग्रा मंडळ साखरखेर्डा आणि सिंदखेड राजा यांच्या मध्यभागी स्थित आहे. जर या मंडळाचा समावेश साखरखेर्डा अपर तहसील कार्यालयात केला, तर नागरिकांना केवळ जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत येणाऱ्या काही महसुली कामांसाठी आणि दाखल्यांसाठी साखरखेर्डा येथे जावे लागेल. मात्र, याव्यतिरिक्त इतर सर्व तालुकास्तरीय प्रशासकीय कामांसाठी, जसे की निराधार योजना, निवडणूक, पुरवठा, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी, दुय्यम निबंधक खरेदी-विक्री, महावितरण, भूमी अभिलेख, उपविभागीय अधिकारी (एसडीओ), तालुका आरोग्य अधिकारी, एकात्मिक बाल विकास अधिकारी (आयसीडीएस-अंगणवाडी), दिवाणी-फौजदारी न्यायालय, शैक्षणिक आणि क्रीडा संबंधित कामांसाठी सिंदखेड राजा येथेच जावे लागणार आहे.

 

यामुळे, केवळ काही कामांसाठी साखरखेर्डा येथे जाऊन पुन्हा उलट दिशेने सिंदखेड राजा येथे ये-जा करणे मलकापूर पांग्रा मंडळातील शेतकरी, विद्यार्थी, वृद्ध, महिला आणि सर्वच नागरिकांसाठी अत्यंत गैरसोयीचे ठरणार आहे.

 

सिंदखेड राजाच का सोयीचे

ग्रामस्थांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, या मंडळातील नागरिक बाजारपेठ, आरोग्य, शैक्षणिक इत्यादी सुविधांसाठी जालना, दे. राजा, छत्रपती संभाजीनगर येथे नेहमी ये-जा करतात. याच मार्गावर सिंदखेड राजा तहसील कार्यालय असल्याने ते अधिक सोयीचे ठरते. त्यामुळे, मलकापूर पांग्रा मंडळाचा समावेश सिंदखेड राजा तहसील कार्यालयातच ठेवल्यास नागरिकांची होणारी गैरसोय टाळता येईल, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.

 

ग्रामसभा ठराव आणि उपोषणाचा इशारा

या मागणीच्या समर्थनार्थ, मलकापूर पांग्रा मंडळातील 14 गावांच्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन तसे ठराव संमत करण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी शासनाला विनंती केली आहे की, ही मागणी प्रशासकीय दृष्टिकोनातून आणि नागरिकांच्या सोयीसाठी न्याय्य व योग्य आहे. यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन शासन आदेश पारित करावा.

 

निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, जर ही मागणी 10 दिवसांत पूर्ण झाली नाही आणि याबाबतीत कार्यवाही होऊन शासकीय आदेश निघाला नाही, तर दिनांक 1 मे 2026 पासून सिंदखेड राजा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल.

 

निवेदन सादरकर्ते आणि प्रतिलिपी

हे निवेदन मलकापूर पांग्रा, वर्दडी, केशव शिवणी, ढोरवि, पोफळ शिवणी, वाघाळा, हनवतखेड, हिवरागडलिंग, झोटींगा, आगेफळ, देऊळगाव कोळ, कोनाटी, कुंबेफळ, बारलिंगा या गावांच्या समस्त ग्रामस्थांतर्फे सादर करण्यात आले आहे. अँड. लुकमान शेख (मलकापूर पांग्रा), परमेश्वर खंदारे (माजी सरपंच व सरपंचपती कोनाटी), डॉ. दिनकरराव सोनुने (माजी सरपंच वाघाळा), डॉ. शिवाजीराव खरात (माजी सरपंच हिवरा गडलिंग) आणि विकास आंधळे (सरपंच केशव शिवणी) या प्रमुख व्यक्तींनी हे निवेदन सादर केले आहे.

आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/

या निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री बुलढाणा, आमदार मनोजभाऊ कायंदे साहेब, विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी बुलढाणा, उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा आणि तहसीलदार सिंदखेड राजा यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

 

या गंभीर मागणीकडे शासन कसे पाहते आणि ग्रामस्थांच्या सोयीसाठी काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top