When disaster strikes from the sky and persecution comes from the ground.
जेव्हा आकाशातून संकट कोसळते आणि जमिनीवरून छळ होतो : महावितरणच्या दुर्लक्षाने शेतकऱ्यांचा उद्रेक

चिखली प्रतिनिधी : निसर्गाच्या लहरीपणाने आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांवर आता महावितरणच्या ढिसाळ कारभाराने दुहेरी संकट ओढवले आहे. शेळगाव आटोळ, अंचरवाडी, अमोना आणि मंगरूळ फिडरवरील विजेच्या लपंडावामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिकांना पाण्याची नितांत गरज असताना, वीजपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे त्यांच्या डोळ्यासमोर उभी पिके करपून जात आहेत. या अन्यायाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी पॉवर हाऊसवर धडक देऊन महावितरणच्या नावाने बोंब मारली आहे.
आसमानी संकटात सुलतानी संकटाची भर
यावर्षी पावसाने दगा दिल्याने शेतकरी दुष्काळसदृश परिस्थितीशी झुंज देत आहेत. विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांवर अवलंबून राहून पिके वाचवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. मात्र, महावितरणच्या नियोजनशून्य कारभाराने त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरवले आहे. वीज कधी येते आणि कधी जाते याचा काही नेम नाही. रात्री-अपरात्री अंधारात शेतात जाऊन मोटारी सुरू करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर ताण येत आहे.
अधिकारी ढिम्म, शेतकरी मेटाकुटीला
वीजपुरवठ्यातील वारंवार होणाऱ्या बिघाडाबाबत शेतकऱ्यांनी संबंधित लाईनमन, कनिष्ठ अभियंता (JE) आणि उपविभागीय अभियंता यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. परंतु, या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. “शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रश्न हा त्यांच्या वर्षभराच्या कष्टाचा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. पण, या जीवघेण्या परिस्थितीची जाणीव संबंधित अधिकाऱ्यांना आहे की नाही?” असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.
पॉवर हाऊसवर शेतकऱ्यांचा एल्गार
महावितरणच्या कार्यालयात तक्रार करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी थेट पॉवर हाऊसवर धाव घेतली. यावेळी त्यांनी ठिय्या आंदोलन करत महावितरणच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि आपला संताप व्यक्त केला. “आम्ही वीज मागतोय, उपकार नाही!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च करून उभे केलेले पीक डोळ्यासमोर कोमेजत असताना वीजपुरवठा सुरळीत न मिळणे म्हणजे शेतकऱ्यांच्या संकटात भर घालण्यासारखे आहे, असे शेतकऱ्यांनी म्हटले.
तात्काळ उपाययोजनांची मागणी, आंदोलनाचा इशारा
“शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत झाला असून, तातडीने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिला. युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर, विजय परिहार, उद्धव चव्हाण, प्रकाश गवते, शिवा चव्हाण, भगवान परिहार, प्रमेश्वर सुरुशे, सागर परिहार, विष्णु परिहार, लक्ष्मण परिहार, अरुण परिहार, विकास चव्हाण, सुरेश पाटील, लक्ष्मण गावडे यांच्यासह परिसरातील असंख्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/
शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळाले नाही तर नुकसान केवळ शेतकऱ्यांचे होत नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे महावितरणने कागदी आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कृती करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. प्रशासन आणि महावितरणने आता तरी शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी कळकळीची विनंती शेतकऱ्यांनी केली आहे. संबंधित फिडरवरील वीजपुरवठ्याची तातडीने पाहणी करून वारंवार होणारे बिघाड कायमस्वरूपी दूर करावेत, वीजपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे आणि शेतकऱ्यांना सुरळीत वीज उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.


