35,211 students will appear for the 12th exam : बारावीच्या परीक्षेला मंगळवार, १० फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. ११७ परीक्षा केंद्रांवरून ३५ हजार २११ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

आजपासून जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान
बुलढाणा : बारावीच्या परीक्षेला मंगळवार, १० फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. ११७ परीक्षा केंद्रांवरून ३५ हजार २११ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. १८ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा जिल्ह्यात पारदर्शक, भयमुक्त आणि ‘कॉपीमुक्त’ वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समितीने या संदर्भात कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, परीक्षा केंद्रांवर कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे.
पेपरची गोपनीयता राखण्यासाठी परिरक्षक केंद्रावरून प्रश्नपत्रिका नेण्यासाठी आणि उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी केवळ चारचाकी वाहनांचाच वापर अनिवार्य करण्यात आला आहे. कोणत्याही शिक्षकाला किंवा रनरला मोटारसायकल वापरण्यास सक्त मनाई आहे.
कॉपीसारख्या गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. भावी पिढी सक्षम घडवण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याला तणावमुक्त वातावरणात परीक्षेसाठी प्रोत्साहित करावे. तसेच, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही परीक्षा प्रक्रिया पूर्णतः पारदर्शकपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी व दक्षता समितीने केले आहे.
परीक्षा केंद्रांवर १४४ कलम लागू
परीक्षेच्या कालावधीत गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांच्या ५० मीटर परिसरात कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आले आहे. तसेच केंद्राच्या परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स, कॉम्प्युटर सेंटर्स आणि मोबाइल सेंटर्स परीक्षा सुरू होण्यापूर्वी दोन तास आधीपासून परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्रिस्तरीय सुरक्षा आणि देखरेख व्यवस्था व्यवस्था तैनात केली आहे.
आठ भरारी पथके
जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आठ पथके कार्यरत केली आहेत.
तिसऱ्या डोळ्याची करडी नजर
जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर आणि १६ परिरक्षक केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
बैठे पथक
प्रत्येक केंद्रावर महसूल विभागाचे ‘बैठे पथक’ तैनात असेल. जे पेपर सुरू होण्यापूर्वी एक तास आधी केंद्रावर उपस्थित राहील.

