A school for tribal students was held on the Zilla Parishad premises. : जिल्हा परिषदेच्या प्रांगणात भरली आदिवासी विद्यार्थ्यांची शाळा

सीईओ गुलाबराव खरात यांनी तातडीने केली सहा शिक्षकांची नियुक्ती
बुलढाणा : जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी भिंगारा गावातील जिल्हा परिषदेच्या निवासी शाळेसह चाळीस टापरी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे होणारे शैक्षणिक नुकसान पाहता पालकांनी विद्यार्थ्यांना २० जुलै रोजी थेट जिल्हा परिषदेत आणून शाळा भरविली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी तातडीने सहा शिक्षकांची नियुक्ती केली.

भिंगारा येथे पहिली ते दहावीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत सहाव्या वर्गापासून दहावीपर्यंत सात शिक्षकांची गरज होती. परंतु गेल्या तीन वर्षांपासून शिक्षकांची सर्वच पदे रिक्त होती. परिणामी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होत चालले होते. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही शिक्षक दिले जात नव्हते, असा आरोप जय आदिवासी संघटनेचे राधेश्याम खरात यांनी केला. एक तर आदिवासी दुर्गम भाग, त्यात कुणीच शाळेकडे लक्ष द्यायला तयार नाही. संयम ढळल्याने राधेश्याम खरात, देवीदास डावर, नंदु सोळंकी यांच्यासह पालकांनी सोमवारी थेट ७५ हून अधिक विद्यार्थ्यांना बुलढाणा येथे आणून जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शाळा भरविली. शिक्षक दिले जात नाहीत, तोपर्यंत जागचे हलणार नाही, असा पवित्रा घेतला.


