Elgar in Buldhana to save education! : जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा वाचवण्यासाठी बुलढाणा येथे ‘शाळा वाचवा कृती समिती’ची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.

शाळा वाचवा कृती समितीची निर्णायक बैठक; लवकरच राज्यव्यापी आंदोलन पेटणार : सतीश पवार यांचा सरकारला थेट इशारा
बुलढाणा : जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा वाचवण्यासाठी बुलढाणा येथे ‘शाळा वाचवा कृती समिती’ची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत शासनाच्या शाळा बंद करण्याच्या धोरणांवर तीव्र शब्दांत आक्षेप घेण्यात आले, तर लवकरच संपूर्ण राज्यात व्यापक आंदोलन पुकारण्याचा निर्धार करण्यात आला.
सरकारी शाळा बंद करणे हा गरिबांच्या शिक्षणावरील घाला आहे, असे सांगत सतीश पवार यांनी आपल्या भाषणात कठोर शब्दांत म्हटले की, बहुजन आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजातील मुलांच्या भवितव्याचा आधार असलेल्या जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा जाणूनबुजून बंद पाडल्या जात आहेत. सरकारची धोरणे ही खासगी इंग्रजी शाळांना प्रोत्साहन देणे आणि सरकारी शाळांना दुर्बळ करण्यासाठी आहेत. संविधानाच्या कलम २२ ए नुसार शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार आहे आणि आरटीई ऍक्ट २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण मिळायलाच हवे. गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा हा कपटी डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा कणखर इशाराही पवार यांनी दिला.
सरकारचे षडयंत्र; आंदोलनाची ध्येयधोरणे
पवार यांनी थेट आरोप केला की, सरकारने नियोजनबद्ध पद्धतीने काही शाळा बंद केल्या आहेत. येत्या काळात आणखी शाळा बंद करण्याचा त्यांचा मानस आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या शाळांच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनी उद्योजकांच्या घशात घालण्याचा सरकारचा कट आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिक्षक, पालक, सजग नागरिक आणि विविध संघटनांच्या समन्वयातून राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच, राज्य शासनाच्या या ‘हुकूमशाही’ धोरणाला पायबंद घालण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात तातडीने जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली.
मागण्यांचा बुलंद आवाज
बैठकीत एकमताने खालील ज्वलंत मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले.
– सरकारी शाळा बंद करणे तत्काळ थांबवा
– प्रत्येक सरकारी शाळेत सीबीएससी अभ्यासक्रम त्वरित लागू करा.
– सर्व शाळांमध्ये आधुनिक भौतिक सुविधा तात्काळ उपलब्ध करा.
– शिक्षकांसाठी असलेली टीईटी परीक्षेची अट रद्द करा.
– सुविधांअभावी संघर्ष करणाऱ्या शाळांना तातडीने निधी उपलब्ध करून द्या.
– कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक शिक्षकांना काम करण्याची संधी द्या.
– कामचुकार व कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिक्षकांना कठोर शिक्षा देऊन बडतर्फ करा.
कोअर समितीचे गठन आणि समाजाचा भक्कम पाठिंबा
याच बैठकीत ‘शाळा वाचवा कृती समिती’च्या शक्तिशाली कोअर समितीचेही गठन करण्यात आले. या समितीत विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे, ज्यात कमलाकर काकडे, उद्धव मुळे, अर्जुन खरात, प्रा. कडबा पैठणे, प्रा. जयकुमार गवई, समाधान झीने, चंद्रकांत धुरंदर, मिलिंद जाधव, सुरेश जाधव, गुलाबराव गवई, जितेंद्र खंडेराव, प्रा. अमर चव्हाण, राहुल शिंगारे, विशाल साळवे, विजय पवार, राजू बनसोडे, विलास खंडेराव, मुकुंदा हेलोडे, यशवंत खंडेराव, भारत खंडेराव, अमोल इंगळे, एकनाथ खंडेराव, पंजाबराव गवई, ॲड. संदीप जाधव, रोशन शिखारे, शेषराव मोरे, सुनील खंडेराव, समाधान गवई, मोहन गवई, गौतम वानखेडे, विष्णू खंडेराव, भीमराव खंडेराव, सय्यद जे.बी., महेंद्र गवई, सुनील गवई, शैलेश यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

शाळा वाचवा लोकचळवळ
सतीश पवार यांनी ‘शाळा वाचवा’ हे केवळ एक आंदोलन नसून, ती एक लोकचळवळ असल्याचे सांगत, या अभियानात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन केले. ज्या देशात शिक्षणासारख्या पवित्र विषयावर आंदोलन करण्याची वेळ येते, ते त्या देशातील सरकारचे सर्वात मोठे अपयश आहे, या शब्दांत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

