A maid, sisters attacked from Shivaji’s statue; clothes torn : छत्रपती शिवाजी महाराज यांचा लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात बसविलेला पुतळा हटविण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. त्याचवेळी वाघिणीसारखी धावून गेलेल्या संजीवनी वाघ यांच्यासह काही महिलांवर एका समाजातील महिला व पुरुषांनी हल्ला केला. बेदम मारहाण केली. त्यांचे कपडे फाडून अपमानित केले.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावातील चीड आणणारी घटना : मारहाण करीत महिलांना केले अपमानित : सर्वत्र संताप : रास्ता रोको, बंद : ठिकठिकाणी निषेध
लोणार : सर्वांची अस्मिता, अभिमान, देशगौरव, रयतेचे राजे, आई, बहिणींचा आदर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात बसविलेला पुतळा हटविण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. त्याचवेळी वाघिणीसारखी धावून गेलेल्या संजीवनी वाघ यांच्यासह काही महिलांवर एका समाजातील महिला व पुरुषांनी हल्ला केला. बेदम मारहाण केली. त्यांचे कपडे फाडून अपमानित केले. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ही माणुसकीला काळिमा फासणारी आणि चीड आणणाऱ्या घनटेचे VDO व्हायरल होताच राज्यभर संतापाचा उद्रेक झाला. त्या महिलांच्या रक्षणासाठी बुलढाणा जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातून समाजबांधवांनी चिखला गावाकडे कूच केली. जिल्ह्यात काही ठिकाणी रास्ता रोको आणि बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी या निंदनीय घटनेचा, नीच वृत्तीचे प्रदर्शन करणाऱ्या लोकांचा ठिकठिकाणी निषेध नोंदविण्यात आला. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनीही चिखला येथे भेट देऊन महिलांना धीर देत आम्ही तुमच्या रक्षणासाठी आल्याचे सांगत, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा दिला.
या घटनेमुळे पोलीस प्रशासन तळ ठोकून आहे. घटनेतील आरोपी असलेल्या ३७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले, तर २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, डीवायएसपी प्रदीप पाटील, डीवायएसपी मनीषा कदम, डीवायएसपी संतोष खाडे यांच्यासह मोठा फौजफाटा चिखला येथे आहे. आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. आशिष रहाटे, दिलीप वाघ, लोणार तालुकाप्रमुख राजू बुधवत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रात्रीच आरोपींच्या अटकेसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. दुसऱ्या दिवशी, २१ फेब्रुवारीला आमदार मनोज कायंदे, आमदार संजय गायकवाड, राष्ट्रवादीचे नाझेर काझी यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेतली.


चिखला येथे अंगणवाडजवळील ग्रामपंचायतीच्या जागेत अज्ञात व्यक्तींनी पंधरा दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला होता. परंतु पुतळा बसविण्यास एका समाजाच्या लोकांनी विरोध केला होता. २० फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता पुतळा लोक काढण्याच्या तयारीत होते. ही बाब समजताच शिवसेना (उबाठा) महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख संजिवनी वाघ यांच्यासह बहीण अयोध्या विष्णू मिसाळ, आई गुंफा वाघ, भाऊ विठ्ठल वाघ, गजानन घोडके, सचिन ठाकरे, वैभव सिनगारे, ज्ञानेश्वर सिनगारे, गणेश मानवतकर व इतर पाच ते सहा मराठा समाजाचे लोक गेले. यावेळी बीबी पोलीस ठाण्याचे ठाणेदारासह पोलीस कर्मचारी व सरपंच गणेश भास्कर काकड, नाथा एकनाथ जायभाये, गजानन भीमराव नागरे, विजय विठोबा मुंढे, संजय विश्वनाथ मुंढे, बाबू तिडके, नीलेश काकड, प्रताप काकड, एकनाथ काकड, उद्धव सानप, संजय दशरथ मुंढे, संजय विश्वनाथ मुंढे व इतर दोनशे ते तिनशे वंजारी समाजाचे महिला व पुरुष जमलेले होते. पुतळा काढण्याला विरोध केला. सर्वांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठिय्या मांडला. यामुळे वाद उफाळून आला. तारामती मुंढे, दीपाली काकड, सरपंच गणेश काकडची पत्नी सुनीता काकड, भाग्यश्री राजू सोनुने, बाळू जगन सोनुने, ज्योती मुंढे, वंदना मुंढे, रेखा सोनुने, दुर्गा सानप व इतर महिलांनी आयोध्या विष्णू मिसाळ, भाची पल्लवी वाघ, वहिणी दीपाली विकास वाघ आई गुंफा वाघ, वंदना घोडके, महाज्योती मानवतकर, रेखा वाघ यांना केस ओढून मारहाण केली. गणेश काकड, गजानन नागरे, बाळू नागरे, स्वप्निल मुंढे, राजू सोनुने, जगन सोनुने, बाळू रामेश्वर मुंढे, एकनाथ काकड, प्रताप काकड, गणेश केदार, कैलास वाघ, नंदू वाघ, सुनील काकड, बाबू तिडके, प्रल्हाद नागरे, प्रल्हाद शंकर काकड, उद्धव सानप, माया जायभाये, संजय दशरथ मुंढे, नीलेश काकड, भगवान शिवराम काकड, निवास काकड, विजय विठोबा मुंढे, शिवानंद विठोबा मुंढे, ज्ञानेश्वर बुधवत, बाबू रामचंद्र नागरे, कैलास विठोबा नागरे, सुनील अंबादास काकड, विजय विठोबा मुंढे, शिवानंद विठोबा मुंढे, ज्ञानेश्वर मुंढे, नीलेश काकड, भगवान शिवराम काकड, सुनील अंबादास काकड व इतर वंजारी समाजाच्या लोकांनी संजिवनी वाघ यांना घेराव घालून मारहाण केली. त्यांच्या अंगावरील कपडे फाडले. केस ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. राजू सोनुने याने दगड डोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु वाघ यांचा भाऊ विठ्ठल याने राजू सोनुने याला बाजूला लोटले. हा दगड पायावर पडून अयोध्या जखमी झाली. सरपंच गणेश भास्कर काकड याने संजिवनी वाघ यांच्या गळ्यातील सोन्याची आठ ग्रॅमची साखळी हिसकावली, अशी तक्रार संजीवनी वाघ यांनी केली. त्यानुसार पोलिसांनी आठ महिलांसह ३७ जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता ११९ (१), ७४, ७६, १८९ (२), १९१ (२), ११५ (२), ११८ (१), १२५ (बी), ३५१ (२), ३५२ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), ३७ (३), १३५ नुसार गुन्हे दाखल केले. .
‘आम्ही कराडचे चेले, तुझा देशमुख करू’
‘आम्ही वाल्मिक कराड याचे चेले असून, जसे संतोष देशमुखचे हाल केले, तसे तुमचे हाल करून तुलाही मारून टाकू’, अशा धमक्या यावेळी देण्यात आल्याचे संजिवनी वाघ यांनी पोलिस तक्रारीत नमूद केले आहे.
आरोपींमध्ये यांचा समावेश
तारामती मुंढे, दीपाली काकड, सुनीता काकड, भाग्यश्री राजू सोनुने, बाळू जगन सोनुने, ज्योती मुंढे, वंदना मुंढे, रेखा सोनुने, दुर्गा सानप, गणेश काकड, गजानन नागरे, बाळू नागरे, स्वप्निल मुंढे, राजू सौंदाजी सोनुने, जगन सोनुने, बाळू रामेश्वर मुंढे, एकनाथ काकड, प्रताप काकड, गणेश केदार, कैलास वाघ, नंदू वाघ, सुनील काकड, बाबू तिडके, प्रल्हाद नागरे, प्रल्हाद शंकर काकड, उद्धव सानप, देवीदास जायभाये, संजू दशरथ मुंढे, नीलेश काकड, भगवान शिवराम काकड, निवास काकड, विजय विठोबा मुंढे, शिवानंद विठोबा मुंढे, ज्ञानेश्वर बुधवंत, बाबू रामचंद्र नागरे, कैलास विठोबा नागरे व सुनील अंबादास काकड यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यातील २१ आरोपींना पोलिसांनी अटक केली.
रास्ता रोकोने राष्ट्रीय महामार्ग ठप्प
चिखला येथील घृणास्पद घटनेची माहिती समजताच बीबी येथील पोलीस ठाण्यासमोरून गेलेल्या मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर संतप्त मराठाबांधवांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. २० फेब्रुवारीला रात्री ८ वाजेपासून ते २१ च्या पहाटे चार वाजेपर्यंत हा रस्ता ब्लॉक करण्यात आला होता. यामुळे वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनामुळे मार्ग बंद असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी दोन ठिकाणाहून वाहतूक पर्यायी मार्गाने तर काही वाहतूक समृद्धी महामार्गाने वळविली होती.

बाळराजेंनी दिला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा
या घटनेबद्दल खेद व्यक्त करीत छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी संजीवनी वाघ यांना संपर्क करून आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले. तसेच सूर्यास्तापूर्वी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा भेट देण्याचे वचन दिले. त्याची पूर्ती करीत बाळराजेंनी शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाठवून दिलेला शब्द पूर्ण केला. या पुतळ्याची प्रतिष्ठापना चिखला येथे करण्यात आली.


