Village Employment Assistants struggle a success : जिल्ह्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.

बुलढाणा : जिल्ह्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाची आमदार संजय गायकवाड यांनी दखल घेत प्रशासनाला धारेवर धरले. यामुळे प्रशासनाकडून दहा दिवसांत मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर २८ फेब्रुवारीला उपोषण मागे घेण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करण्यात आले होते. ३ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार आठ हजार रुपये मानधन द्यावे, प्रवास भत्त्याची अंमलबजावणी, युजर आयडी-पासवर्ड उपलब्ध करणे, मानधन न देणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई, राजकीय हस्तक्षेपाने पदावरून काढलेल्यांना पुन्हा नेमने, दुय्यम नियुक्त्या रद्द करणे अशा विविध मागण्यांसाठी ग्राम रोजगार सहायकाने उपोषण सुरू केल्याने मनरेगा योजनेची कामे जिल्हाभर ठप्प झाली होती. यामुळे हजारो मजुरांची रोजीरोटी धोक्यात आली होती.
आमदार संजय गायकवाड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून मागण्यांचे निवेदन स्वीकारले आणि संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांच्या दबावामुळे प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेतली. अधिकाऱ्यांनी १० दिवसांत सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. उपोषणकर्त्यांना सरबत देऊन आमदार गायकवाड यांनी स्वतः उपोषणाची सांगता केली.
आमदार संजय गायकवाड यांच्या अथक प्रयत्नांमुळे आमचा लढा यशस्वी झाला, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत देशमुख यांनी सांगितले. आश्वासन पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या यशस्वी मध्यस्थीमुळे जिल्ह्यातील ग्राम रोजगार सहाय्यक आणि मनरेगा मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनरेगा कामे लवकरच पुन्हा सुरू होण्याची शक्यता वाढली असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

