Union Minister Prataprao Jadhav inaugurated the Mega Revenue Grievance Redressal Camp. महाराजस्व समाधान शिबिराचं केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले उद्घाटन.

बुलढाणा (प्रतिनिधी), दि. १४ मार्च : राज्य सरकारच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी लोणार तालुक्यातील अतिदुर्गम हिरडव येथे आज ‘महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, “शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहजपणे ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. सामान्य जनतेच्या समस्या एकाच छताखाली सोडवण्यासाठी हे शिबिर आयोजित केले गेले आहे. ग्रामीण भागातील लोकांनी या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा.”
शिबिरात महसूल विभागासह १५ हून अधिक विभागांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये डिजिटल ७/१२, ८-अ वाटप व फेरफार प्रकरणांचा निपटारा, उत्पन्न, जात व रहिवासी दाखले, ‘आभा’ (ABHA) कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, पीएम किसान ई-केवायसी, युनिक फार्मर आयडी आदी सेवा देण्यात आल्या. लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व लाभ वाटप करण्यात आले.
शिबिरादरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सर्व अर्ज स्वीकारले आणि त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. “प्रशासनातील अधिकारी साहेबी थाट बाजूला सारून जनतेचे सेवक म्हणून काम करतील. जनतेच्या हिताचे कामे वेळेत पूर्ण करा,” असे ते म्हणाले.
विशेष म्हणजे, शिबिरातील स्टॉलला भेट देताना वढव येथील रेणुकाबाई फड यांनी घर नसल्याची व्यथा मांडली. अधिकाऱ्यांनी जागा नसल्याचे सांगितल्यावर केंद्रीय मंत्री जाधव यांनी त्वरित दखल घेतली. “पंडित दीनदयाळ उपाध्याय आवास योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी १ लाख रुपये मिळतात. त्यातून रेणुकाबाईंना जागा घेऊन द्या आणि घरकुल योजनेत घर बांधण्यासाठी मदत करा,” असे निर्देश दिले. या त्वरित प्रतिसादामुळे रेणुकाबाईच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

व्यासपीठावर माजी आमदार संजय रायमुलकर, तहसीलदार भूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. मापारी आदी उपस्थित होते.
या शिबिरामुळे अतिदुर्गम भागातील जनतेला शासकीय योजनांचा थेट आणि त्वरित लाभ मिळाला असून, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्कपूर्ण वागण्याने उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


