mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

३० मार्च ते ४ एप्रिलदरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता : Chance of thunderstorms in the state 

शेअर करा :

Chance of thunderstorms in the state : ३० मार्च ते ४ एप्रिल या कालावधीमध्ये आस्मानी संकट कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Chance of thunderstorms in the state
संग्रहित छायाचित्र

सीएमओ कार्यालयाचे ट्विट : कृषी विभागाचाही सावधानतेचा इशारा

बुलढाणा : ३० मार्च ते ४ एप्रिल या कालावधीमध्ये आस्मानी संकट कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रब्बी पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. आता पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्ती कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने बळीराजाच्या मनामध्ये धस्स झाले आहे.

३० मार्चपासून राज्यात ढगाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ३० मार्च रोजी प्रामुख्याने  खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातदेखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो. या संदर्भातील ट्विट सीएम कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

३० मार्चच्या तुलनेत ३१ मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर १ ते ४ एप्रिलदरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

 

सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन

मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशावेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

२०१ गावे बाधित; आता काय होणार?

१८ व १९ मार्च असे दोन दिवस जिल्ह्याच्या काही भागांमध्ये वादळी वारा आणि गारपीटीसह पाऊस झाला. यामुळे २०१ गावांमध्ये ३८०२ हेक्टर वरील पिकांची नासाडी झाली. यामुळे शेतकरी खचून गेला आहे. पिके काढणीच्या कालावधीतच रब्बी हंगामाला फटका बसला. आता नुकसानीत भर पडल्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामात काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला असतानाच पुन्हा अवकाळी दणका बसण्याची शक्यता वर्तविल्याने संकट अधिक गडद झाले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top