Eight working women killed in Samruddhi : भरधाव कंटेनरने चिरडल्यामुळे आठ महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिलांसह एकाची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

कंटेनरने चिरडले : जालन्याच्या कडवंची शिवारात हृदय पिळवटून टाकणारा अपघात
जालना : साफसफाईची कामे आटोपून घराकडे निघण्याच्या तयारीत असलेल्या कामगार महिलांवर कंटेनररुपी काळाने क्रूर झडप घतली. भरधाव वेगातील या वाहनाने चिरडल्यामुळे आठ महिलांचा मृत्यू झाला, तर दोन महिलांसह एकाची मृत्यूशी झुंज सुरू आहे. समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यात कडवंची शिवारामध्ये १ एप्रिलच्या सायंकाळी पाच वाजता ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. या अपघाताने मराठवाडाच नाही तर अख्खा महाराष्ट्र हळहळला आहे.
अलकाबाई दादाराव आदमाने (४५), कांचनबाई प्रकाश आदमाने (५०), मीना परमेश्वर आदमाने (४४), सुमनबाई कचरू आदमाने (७०) सर्व राहणार निधोना, ता. जि. जालना, ताराबाई गहनाजी चौधरी (४५), कडूबाई रामदास मदन (४५), लक्ष्मीबाई संतोष मदन (४५) सर्व राहणार केळी गव्हाण, ता. बदनापूर, जि. जालना आणि मंगलबाई प्रकाश शिनगारे (५५) रा. खादगाव अशी या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत.
प्रयागबाई बाबासाहेब वाघ (३०), कविता विठ्ठल चौधरी (३५) व दिनेश रंगनाथ गायकवाड असे तीन जण जखमी झाले. रेवती मदन, कासाबाई मदन या किरकोळ जखमी झाल्या.
जालना व बदनापूर तालुक्यातील महिला समृद्धी महामार्गावर साफसफाईचे काम करीत होत्या. १ एप्रिल रोजी काम संपल्यानंतर कडवंची शिवारात चॅनल क्रमांक ३५२ वर एमएच-२०- सीटी-२४६५ या पिकअपमध्ये महिला बसण्याच्या तयारीत होत्या. तर काही जणी उभ्या होत्या. त्याचवेळी नागपूरहून मुंबईच्या दिशेने सुसाट वेगाने निघालेल्या एमएच४३-सीई-६३८८ क्रमांकाच्या कंटेनरने महिलांना चिरडले. या भीषण दुर्घटनेमध्ये सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला तर दोघींची रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
चालकाला अटक
कंटेनर चालक प्रकाश राजवर (सुलतानपूर उत्तर प्रदेश) याला संतप्त ग्रामस्थांनी चोप दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.


