Dr. Babasaheb Ambedkar: The True Liberator of Workers and the Champion of Equality : डॉ. बाबासाहेब आंबेडकर: कामगारांचे खरे उद्धारकर्ते आणि समानतेचे प्रणेते

बुलढाणा :
बुलढाणा येथील एस.टी. बसस्थानकावर नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी, प्रा. विशाल नंदागवळी यांनी डॉ. आंबेडकरांना कामगारांचे खरे उद्धारकर्ते म्हणून गौरवताना, त्यांच्या दूरदृष्टीचे आणि अथक कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रा. नंदागवळी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांचे दोन प्रमुख शत्रू ओळखले होते: ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही. ब्राह्मणशाही, जी समानता, जगण्याचे स्वातंत्र्य आणि न्याय नाकारते, तर भांडवलशाही, जी कामगारांचे आर्थिक शोषण करते. या दोन्ही शक्तींपासून कामगारांनी सावध राहावे, असा संदेश डॉ. आंबेडकरांनी दिला. विशेष म्हणजे, देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच मजूरमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून दिले.
राज्य परिवहन महामंडळाच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महात्मा ज्योतिराव फुले यांची १९९ वी जयंती देखील साजरी करण्यात आली. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. नंदागवळी उपस्थित होते, तर महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कारप्राप्त साहित्यिक सुरेश साबळे, पत्रकार सिद्धार्थ आराख, सुनील तिजारे आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाठ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर विभागीय वाहतूक अधिकारी दिगंबर जाधव, राहुल तांबडे, विनोद इलामे, अजय नाईक, अनिल बहिरम, आगार व्यवस्थापक अमोल गडलिंग, स्थानक प्रमुख रामकृष्ण पवार, वाहतूक निरीक्षक पद्माकर मगर, तुकाराम धारपवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी महिला हिरकणी कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. साहित्यिक सुरेश साबळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून रा.प. महामंडळातील आंबेडकर जयंतीचा इतिहास आणि फुले-आंबेडकरी विचारांची प्रासंगिकता स्पष्ट केली. ते म्हणाले की, जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकाच वेळी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय आघाड्यांवर कार्य केले. जोतिराव फुले यांच्या स्वप्नातील भारतीय समाज आणि मानवी कल्याणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या रूपात विस्तारित करत मूर्त स्वरूप दिले. भारतीय महिला आणि कामगारांचे ते उद्धारकर्ते आहेत, शिवाय भारतीय नागरिकांना विनासंघर्ष मतदानाचा हक्क आणि अधिकार त्यांनी मिळवून दिला आहे.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन काष्ट्राईब राप संघटनेचे विभागीय अध्यक्ष दीपक मिसाळकर यांनी केले, तर आगार व्यवस्थापक अमोल गडलिंग यांनी आभार प्रदर्शन केले.
या उत्सवाचे औचित्य साधून संपूर्ण बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. विद्युत रोषणाईने स्थानक उजळून निघाले होते. एस.टी.मधील सर्व कामगार संघटनांनी, कामगार आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत हा उत्सव सामूहिकरीत्या साजरा करून एकतेचा संदेश दिला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्रदीप इंगळे सर आणि त्यांच्या संचाने सादर केलेल्या ‘भीमस्वर’ गायनाने वातावरणात चैतन्य निर्माण केले.

अध्यक्षीय भाषणात विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाठ यांनी डॉ. आंबेडकरांचे महिला आणि कामगार विषयक कार्य विस्तृतपणे मांडले, तर सुरक्षा दक्षता अधिकारी जयंत कांडलकर यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डी. टी. अंभोरे, नरेंद्र खरे, प्रदीप जाधव, जी. पी. मोरे, अनिल वाळके, विजया गवई, ज्योती खरे, व्ही. डी. हिवाळे, आर. डी. हिवाळे, राजू पवार, संजय उबरहंडे, संदीप डुकरे, के. व्ही. प्रधान, पद्माकरअण्णा डोंगरे, आत्माराम चौतमोल, सुभाष गवई, प्रमोद पवार, विशाल जाधव, सचिन हिवाळे, जी. जे. सरदार, डी. एस. इंगळे, लक्ष्मी बंड, प्रतिभा वानखेडे, जितू साळवे, भारत आराक, दीपक मिसाळकर, राजेंद्र पवार, सोनू पाटील, सोनू बावसकर, राजू आगाशे, सचिन शेळके यांच्यासह असंख्य एस.टी. कर्मचारी व अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


