Wife murdered in a quarrel : मालेगाव : कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार करून संपविल्याची खळबळ जनक घटना मालेगाव शहरातील अकोला फाटा डाक कार्यालयासमोर २७ एप्रिलच्या सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.

मालेगावात भरदिवसा खुनाचा थरार : पतीला अटक
किरण पखाले
मालेगाव : कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार करून संपविल्याची खळबळ जनक घटना मालेगाव शहरातील अकोला फाटा डाक कार्यालयासमोर २७ एप्रिलच्या सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या खुनी थरारामुळे जिल्हाभर खळबळ उडाली आहे.
पुष्पा विठ्ठल वाघ (वय ३४) असे मृत महिलेचे नाव आहे. पती विठ्ठल परसरम वाघ याला पोलिसांनी अटक केली आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात येणाऱ्या पांगरी नवघरे येथील रहिवासी असलेल्या या दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कारणावरून खटके उडत होते. दोघांमध्ये नेहमीच वाद होत असत. २७ एप्रिल रोजी सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास अकोला फाटा पोस्ट ऑफिससमोर दोघांमध्ये वाद झाला. या वादातून आरोपी पतीने धारदार चाकूने पत्नीवर वार करून तिला ठार केले. ओम नारायण राऊत (वय २७) रा. बेलगाव, ता. मेहकर,
जि. बुलढाणा) यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) नुसार मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलीस निरीक्षक राजेश क्रांती खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले एन.
पोलीस स्टेशनपासून अवघ्या तीन किमी अंतरावर भरदिवसा ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल, ठाणेदार राजेश खेरडे यांच्यासह पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटना घडल्यानंतरही पंचनाम्याअभावी तीन तास मृतदेह पडून होता. मालेगाव पोलीस तातडीने पोहोचले. मात्र शासकीय पंच समक्ष पंचनामा करावा लागत असल्याने शासकीय कर्मचारी असलेले पंच पंचनाम्याकरिता सहजतेने उपलब्ध होत नाहीत किंवा खूप विलंब लावतात. त्यामुळे पोलिसांना सुद्धा शासकीय पंचाची वाट पाहत ताटकळत बसावे लागते. घटनेचे गांभीर्य बघता शासकीय पंच सहज उपलब्ध व्हावे, यासाठी वरिष्ठ पातळीवरून कडक सूचना देण्याची गरज आहे.


