Chase Genre Thriller: Gang of Robbers Caught : रत्न व सुलेमानी हकीक खड्याच्या विक्रीच्या बहाण्याने नांदेड जिल्ह्यातील एकाला मारहाण करीत सोन्या, चांदीचे दागिने व रोख असा सुमारे पावणेपाच लाखांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

जालना जिल्हा हद्दीत बुलढाणा पोलिसांची कारवाई
बुलढाणा : रत्न व सुलेमानी हकीक खड्याच्या विक्रीच्या बहाण्याने नांदेड जिल्ह्यातील एकाला मारहाण करीत सोन्या, चांदीचे दागिने व रोख असा सुमारे पावणेपाच लाखांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा व अंढेरा पोलिसांच्या पथकांनी जालना जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत शेतशिवारात तीन किलोमीटरपर्यंत सिनेस्टाइल पाठलाग करून पाच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या.
नांदेड जिल्ह्यातील शंकरनगर, वसरणीचे रहिवासी चंद्रशेखर गुंडय्या स्वामी (वय ३२) याला आरोपी नीलेश नरेश भोसले, जॅकीचंद विरोधभाई पवार (रा. साकेगाव ता. चिखली) यांनी रत्न व सुलेमानी हकीक हा खडा विक्री करायचा असल्याचे सांगत खड्याचा व्हिडीओ पाठविला. १ मे रोजी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास चिखली येथील हॉटेल राजवाडा येथे आरोपींनी बोलावून घेतले. नीलेश भोसले, जॅकीचंद पवार, आदित्य शेणू भोसले, राज अभिमान पवार व भाऊराजा शाबनदार पवार व अन्य एकाने चंद्रशेखर स्वामीस मारहाण करून त्याच्याजवळील सोने, चांदी व अष्टधातूचे दागिने तसेच वीस हजार रुपये रोख असा ४ लाख ८९ हजार रुपंयाचा ऐवज लुटला. नंतर आरोपींनी पलायन केले.
या प्रकरणी अंढेरा पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. दरोड्याचा गुन्हा असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने व अंढेरा ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी पथके नेमली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, यातील आरोपी नीलेश भोसले गुन्ह्यातील आरोपी नीलेश भोसले याला साकेगाव येथून उचलण्यात आले. उर्वरित आरोपी जालना जिल्ह्याकडे पळून जात असल्याचे समजल्यानंतर जिल्ह्यात नाकाबंदी करून शोध सुरू करण्यात आला.
आरोपींचा माग काढत पक्की खबर मिळाल्याने जालना जिल्हा हद्दीपर्यंत पाठलाग करण्यात आला. आरोपी शेतात पळून जात असल्याचे आढळल्याने शेतामध्ये तीन किलोमीटर अंतरापर्यंत पोलिसांनी थरारक पाठलाग केला. अखेर जॅकीचंद पवार, आदित्य भोसले, राज पवार, भाऊराजा पवार या चार आरोपींना अटक करण्यात यश मिळाले.
लुटलेला ऐवज जप्त
आरोपींच्या ताब्यातून दोन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे कानातील कुंडल, चांदीचे कडे, चांदीचे ब्रासलेट, चांदी, अष्ट धातू गदा असा लुटलेला ऐवज शंभर टक्के हस्तगत करण्यात आला.


