Ambad Tehsildar caught in ACB trap : अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष करण्यासाठी ६.४० लाखांची लाच; अंबडचे तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

जालना, दि. ५ : जालना जिल्ह्यातील अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण याला अवैध वाळू वाहतूक प्रकरणात कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराकडे पोकलेन मशीन तसेच सहा हायवा ट्रक असून त्यांच्या माध्यमातून वाळू वाहतूक केली जात होती. या वाहनांवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता व्यवसाय सुरळीत सुरू राहावा यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांनी दरमहा ७ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
तहसीलदाराच्या या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सापळा रचून कारवाईची योजना आखली. चर्चेनंतर ७ लाख रुपयांऐवजी ६ लाख ४० हजार रुपये देण्याचे ठरले होते.
शनिवारी ठरलेल्या ठिकाणी तहसीलदार विजय चव्हाण हे लाचेची रक्कम स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. कारवाईनंतर त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या धडक कारवाईमुळे महसूल विभागातील कथित भ्रष्ट व्यवहार पुन्हा एकदा चर्चेत आले असून अवैध वाळू व्यवसाय आणि काही शासकीय अधिकाऱ्यांमधील आर्थिक संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एसीबीकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या इतर संबंधितांवरही कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लाचेची मागणी थेट दरमहा ७ लाखांची
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी तहसीलदाराने दरमहा तब्बल ७ लाख रुपयांची मागणी केल्याची बाब समोर आली आहे. पडताळणीनंतर एसीबीने सापळा रचत ६ लाख ४० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना तहसीलदाराला अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


