mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

पुनर्मूल्यांकनानंतर ओम सिरसाट तालुक्यात प्रथम : Om Sirsat taluka first after revaluation

शेअर करा :

Om Sirsat taluka first after revaluation : पुनर्मूल्यांकनानंतर ओम सिरसाट तालुक्यात प्रथम, बोर्डाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Om Sirsat taluka first after revaluation


चिखली: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ढिसाळ कारभाराचा एक ज्वलंत नमुना चिखली येथे समोर आला आहे. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थ्याच्या पालकांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला असता, धक्कादायक बाब उघडकीस आली. या विद्यार्थ्याचे तब्बल २३ गुण वाढले असून, तो आता तालुक्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. बोर्डाच्या या हलगर्जीपणामुळे विद्यार्थी आणि पालकांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत, मूळचा रायपूरचा आणि सध्या एकलारा येथे स्थायिक असलेला ओम अनिल सिरसाट याने चिखलीच्या आदर्श विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातून परीक्षा दिली होती. शाळेत नेहमीच टॉपर राहिलेल्या ओमला बारावीतही चांगले गुण मिळतील अशी सर्वांना खात्री होती. मात्र, निकाल जाहीर झाल्यावर त्याला ८७.३३ टक्के गुण मिळाल्याने सर्वांनाच धक्का बसला. आपल्या मुलाला यापेक्षा जास्त गुण मिळायला हवेत याची खात्री असल्याने, ओमच्या पालकांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. यानंतर जाहीर झालेल्या निकालात ओमचे तब्बल २३ गुण वाढले आणि तो तालुक्यात प्रथम क्रमांकावर आला.

ओम सिरसाटची शैक्षणिक कारकीर्द नेहमीच उज्ज्वल राहिली आहे. दहावीच्या परीक्षेतही तो प्रथम आला होता. याव्यतिरिक्त, स्कॉलरशिप, एनएमएमएस, ऑलिम्पियाड यांसारख्या अनेक परीक्षांमध्ये त्याने सुवर्णपदके पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. नुकत्याच झालेल्या जेईई ॲडव्हान्स २०२६ मध्येही त्याने देशात ओबीसी प्रवर्गातून २२३ वा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. प्रतिकूल परिस्थितीतून त्याने हे यश मिळवले असून, ते इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. आपल्या या यशाचे श्रेय ओमने आपले गुरुजन आणि आई-वडिलांना दिले आहे.

या घटनेमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासणी पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नॉन-ग्रँड शाळेतील शिक्षकांनी पेपर तपासल्यामुळे चांगल्या विद्यार्थ्यांच्या गुणांवर किती परिणाम होऊ शकतो, याचे हे एक जिवंत उदाहरण आहे. बोर्डाने निकाल लवकर लावण्याच्या घाईत अशा कितीतरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले असेल, याचा अंदाज लावणे कठीण आहे. ओमचे वडील अनिल सिरसाट यांनी बोर्डाकडे आग्रहाची मागणी केली आहे की, यापुढे नॉन-ग्रँड शाळेतील शिक्षकांकडून पेपर तपासणी करण्यापूर्वी त्यांची गुणवत्ता तपासावी, जेणेकरून मुलांचे नुकसान होणार नाही आणि बोर्डाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही. पेपरची फोटोकॉपी मागवण्यासाठी आणि त्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी पालकांना पाच विषय असल्यास किमान साडेतीन हजार रुपये खर्च येतो. ही चूक बोर्डाची आणि पेपर तपासणाऱ्यांची असताना, हा भुर्दंड पालकांना भरावा लागतो. बोर्डाने यावर विचार करावा, अन्यथा विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता वाढून मोठा आक्रोश निर्माण होऊ शकतो. पेपर हे चांगल्या आणि तज्ञ शिक्षकांकडून तपासले जावेत, जेणेकरून बोर्डाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही आणि विद्यार्थ्यांनाही मानसिक त्रास होणार नाही, अशी त्यांची मागणी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top