Gutkha mafia busted in Sakharkheda : साखरखेर्ड्यात गुटखा माफियांना दणका: १८ लाखांचा प्रतिबंधित पान मसाला जप्त

बुलढाणा : जिल्ह्यातील साखरखेर्डा शहरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि सुगंधित पान मसाल्याच्या विक्रीवर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करत मोठा दणका दिला आहे. या कारवाईत तब्बल १८ लाख २१ हजार ९२१ रुपये किमतीचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा आणि साखरखेर्डा पोलीस स्टेशन यांच्या समन्वयाने यशस्वी करण्यात आली.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, १७ जून २०२६ रोजी साखरखेर्डा शहरात ही धडक मोहीम राबवण्यात आली. साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे अधिकारी, ज्यात ठाणेदार एपीआय गजानन करेवाड, पीएसआय गणेश डोईफोडे आणि अंमलदार रोहिदास पवार, विनायक परिहार, लक्ष्मण इनामे, जानकी केवट यांचा समावेश होता, त्यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्यासोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड आणि त्यांचे पथक, गजानन दराडे, दिनेश बकाले, युवराज राठोड, जगदेव टेकाळे आणि मनोज खर्डे यांचा समावेश होता, यांनीही मोलाची कामगिरी बजावली. या संयुक्त पथकात अन्न व सुरक्षा अधिकारी श्री. भोपळे हे देखील उपस्थित होते.
या पथकाने साखरखेर्डा शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मोठ्या प्रमाणावर सुगंधित पान मसाला आणि गुटखा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत १८ लाख २१ हजार ९२१ रुपये इतकी आहे. हा प्रतिबंधित माल जप्त करून, साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी अक्षय संजय भोपळे, अन्नसुरक्षा अधिकारी, बुलढाणा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही महत्त्वपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड साहेब आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे साहेब यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या विक्रीवर अंकुश ठेवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. समाजाच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या या पदार्थांच्या विरोधात पोलीस आणि प्रशासनाची ही संयुक्त मोहीम कौतुकास्पद आहे.


