Tyre burst; Scorpio overturned : समृद्धी महामार्गाने भरधाव वेगात जाणारी स्कार्पिओ टायर फुटल्याने उलटली. या अपघातात दहा जण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघातामध्ये छत्तीसगडचे दहा जखमी; एक गंभीर
बुलढाणा : समृद्धी महामार्गावर घडणाऱ्या अपघातांची मालिका थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. रविवार, २३ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा एक अपघात घडला. समृद्धी महामार्गाने भरधाव वेगात जाणारी स्कार्पिओ टायर फुटल्याने उलटली. या अपघातात दहा जण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघातग्रस्त छत्तीसगडचे रहिवासी आहेत. नागपूर कॉरिडोर चॅनल क्रमांक ३२५.३ सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली.
छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील हेमंत विश्वकर्मा (वय २४) हे मित्र तीकेस बंदे, रवी साहू, यश साहू, देवेश साहू, अमन साहू, वासू साहू, विकी साहू, किशन विश्वकर्मा, नवीन साहू यांना घेऊन निघाले होते. स्कॉर्पिओ क्रमांक सीजी ०८ बीसी ४४०५ मधून सर्वजण नाशिक येथून नागपूरकडे जात होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास डाव्या बाजूचे टायर उठून चालकाचे नियंत्रण सुटले आणि नियंत्रण सुटून कार उलटली. या अपघातात अमन साहू (वय २५) गंभीर जखमी झाला आहे. उर्वरित नऊ जणांना किरकोळ दुखापत झाली. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साह्याने दुसरबीड टोलनाका येथे लावण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

महामार्ग पोलीस केंद्र मलकापूर टॅब अंतर्गत वाकी समृद्धी महामार्ग उपकेंद्र दुसरबीड पोलीस स्टेशन किनगाव राजा हद्दीमध्ये अपघात झाल्याचे छत्रपती संभाजीनगर सीआरओकडून कळाल्यानंतर पीएसआय वीरकशिद यांच्या सह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.



