The unfillable void left by the veterans who passed away seventy years ago : महाराष्ट्राच्या राजकारणाने गेल्या काही वर्षांत जे नेतृत्व गमावले, ते केवळ आकडेवारीत मोजता येणार नाही. सत्तरीचे वयही न ओलांडता ऐन उमेदीच्या काळात राज्याला सोडून गेलेले दिग्गज नेते म्हणजे महाराष्ट्राच्या वैचारिक आणि प्रशासकीय ताकदीवर झालेला मोठा आघात आहे. स्व. विलासराव देशमुख, स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. आर.आर. आबा पाटील आणि अलीकडे स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने राज्याच्या नेतृत्वाची हानी झाली आहे.





मयूर गोलेच्छा
लोणार : महाराष्ट्राच्या राजकारणाने गेल्या काही वर्षांत जे नेतृत्व गमावले, ते केवळ आकडेवारीत मोजता येणार नाही. सत्तरीचे वयही न ओलांडता ऐन उमेदीच्या काळात राज्याला सोडून गेलेले दिग्गज नेते म्हणजे महाराष्ट्राच्या वैचारिक आणि प्रशासकीय ताकदीवर झालेला मोठा आघात आहे. स्व. विलासराव देशमुख, स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. आर.आर. आबा पाटील आणि अलीकडे स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने राज्याच्या नेतृत्वाची हानी झाली आहे.
हे नेते केवळ सत्ता उपभोगणारे नव्हते, तर सत्तेला दिशा देणारे होते. विलासराव देशमुख यांचा समन्वय आणि सौम्यपणा असो, प्रमोद महाजन यांची आधुनिक, राष्ट्रीय पातळीवरील पकड असो, गोपीनाथ मुंडेंचा ग्रामीण व वंचित समाजाशी असलेला जिव्हाळा असो किंवा आर.आर. आबा पाटील यांची निर्भीड, स्वच्छ आणि कणखर प्रशासनशैली, स्व अजितदादा पवार यांची प्रशासनावरील पकड, कार्यकर्त्यांवरील प्रेम, सर्वसामान्य जनेतीशी भावनिक असलेले नाते, वक्तशीरपणा, काम करण्याची लकब या सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या राजकारणाला ‘कुशन’ दिले होते. आज तो कुशनच हरवलेला दिसतो.
या नेत्यांच्या जाण्याने राज्यातील अनुभवी राजकारण्यांची एक अख्खी फळी संपुष्टात आली आहे. अनुभव, संयम आणि दूरदृष्टी यांचा अभाव आज प्रकर्षाने जाणवतो. सध्याचे राजकारण अधिक प्रतिक्रियावादी, तात्कालिक फायद्यांभोवती फिरणारे आणि सत्तासमीकरणांपुरते मर्यादित झाले आहे. धोरणात्मक विचार, सामाजिक समतोल आणि दीर्घकालीन विकासाची दिशा या मुद्यांना दुय्यम स्थान मिळत आहे.
जर हे नेते अधिक काळ कार्यरत राहिले असते, तर महाराष्ट्राचा राजकीय व सामाजिक प्रवास अधिक स्थिर आणि समतोल राहिला असता. नव्या नेतृत्वाची घडण, प्रशासकीय शिस्त, ग्रामीण-शहरी समन्वय आणि लोकशाही मूल्यांची जपणूक या बाबतीत त्यांचे योगदान निर्णायक ठरले असते.
आज महाराष्ट्राला नव्या चेहऱ्यांपेक्षा परिपक्व विचारांची गरज आहे. सत्तेच्या मोहापेक्षा लोकहिताला अग्रक्रम देणारे, संघर्षातून घडलेले आणि जबाबदारीची जाणीव असलेले नेतृत्व उभे राहिले नाही, तर सत्तरीपूर्वी गेलेल्या या दिग्गज नेत्यांची उणीव राज्याला दीर्घकाळ बोचत राहील. इतिहास त्यांची आठवण ठेवेल, पण वर्तमान मात्र त्यांच्या अभावाची किंमत मोजत राहील.

